मुंबईचा बोनस धमाका; सलग दुसऱ्या सामन्यात महाविजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या सामन्यात बिहारचा डावाने पराभव आणि आता आंध्र प्रदेशचा दहा विकेटस्नी दारुण पराभव करत मुंबईने सलग दुसऱ्या सामन्यात बोनस गुणासह महाविजयाचा धमाका केला. शम्स मुलानीने सामन्यात दहा विकेट घेत मुंबईचा विजय सोप्पा केला.

मुंबईला सलग दुसरा सामनाही डावाने जिंकण्याची सुवर्ण संधी होती. आंध्रचा पहिला डाव 184 धावांत गुंडाळून मुंबईने त्यांच्यावर फॉलोऑन लादला होता. तसेच दुसऱ्या डावात शम्स मुलानीच्या फिरकीने दिवसअखेर 5 बाद 164 अशी अवस्था केल्यामुळे चौथ्या दिवशी आंध्रचा दुसरा डाव 211 धावांच्या आत संपवून डावाच्या विजयासाठी मुंबईने प्रयत्न केले, पण शेक राशीदच्या 66 धावांच्या खेळीने मुंबईला डावाच्या विजयापासून दूर नेले. तसेच तळाच्या शोएब खान (17), के.व्ही. श्रीकांत (20) आणि ललित मोहन (16) यांनी केलेल्या छोटय़ा-छोटय़ा खेळय़ांनी आंध्रला 211 ही धावसंख्या ओलांडून देत डावाचा पराभव टाळला. अखेर आंध्रचा डाव उपाहारापूर्वी 244 धावांवर आटोपला आणि मुंबईने 34 धावांचे माफक आव्हान 9 षटकांत बिनबाद गाठत संघाच्या सलग दुसऱया दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पहिल्या डावात 6 विकेट घेणाऱया शम्स मुलानीने दुसऱ्या डावातही 4 विकेट घेत सामन्यात 161 धावांत 10 विकेट घेण्याची कामगिरी केली. त्याने कारकीर्दीत सहाव्यांदा सामन्यात दहा विकेट घेण्याची किमया साधली. दोन्ही सामन्यांत बोनस गुणासह विजय मिळवल्यामुळे मुंबईचे 14 गुण झाले असून तो पूर्ण स्पर्धेत सर्वाधिक गुण घेणारा संघ ठरला आहे. रणजी सामन्याच्या 32 संघांमध्ये सलग दोन्ही सामन्यांत विजय मुंबई, विदर्भ, गुजरात आणि बडोदा हे चार संघच नोंदवू शकले आहेत. तसेच दोन्ही सामने बोनस गुणासह जिंकणारा मुंबई हा एकमेव संघ आहे.