चिपळूणमध्ये ईव्हीएम बिघाडामुळे मतदान प्रक्रियेला फटका; 40 ते 45 केंद्रांवर अडचणी, मतदारांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांसाठी शनिवारी, मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदानावर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ निश्चित असतानाही तालुक्यातील सुमारे 40 ते 45 मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याने मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली असून काही ठिकाणी मतदार मतदान न करताच माघारी फिरल्याचेही दिसून आले. या संपूर्ण प्रकाराबाबत आमदार शेखर निकम यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

खेर्डी जिल्हा परिषद गटात तब्बल चार ते पाच मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मतदारांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. संतप्त मतदारांनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्रातून माघार घेतल्याची माहिती मिळाली. त्यामुळे माघारी फिरलेले मतदार पुन्हा मतदानासाठी येतील का, असा गंभीर प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.

तालुक्यातील विविध भागांत ईव्हीएम बिघाडाच्या घटना समोर आल्या. मालघर येथे बोटाची शाई आपोआप पुसली जात असल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. शिरगावमध्ये सकाळी जवळपास एक तास दोन मशीन बंद अवस्थेत होत्या, तर सावर्डे कॉलनीत सकाळी ९ वाजता मशीन बंद पडले. याशिवाय पिंपळ मोहल्ला, कुडप, गुढेकरवाडी, मांडकी, खरवते, कोंढरताम्हाणे, कापरे, कापसाळ, कळंबस्ते आदी ठिकाणीही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. खेर्डी येथे बंद पडलेली मशीन नंतर सुरू करण्यात आली, मात्र तोपर्यंत मतदारांमध्ये असंतोष पसरला होता.

खेर्डी, पेढांबे, पिंपळी, सती-चिंचघरी, कळवंडे, कुडप, मालघर कोंढे, शिरगाव आदी अनेक गावांमध्ये अशा घटना घडल्याने निवडणूक यंत्रणेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सकाळच्या सत्रात काही केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती, मात्र मशीन बंद पडल्याने ही गर्दी संतापात बदलल्याचे चित्र दिसले.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला, त्या सर्व केंद्रांवर तात्काळ अतिरिक्त मशीन पाठविण्यात आल्या आहेत. जवळपास ५० जादा ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी पूर्वतयारी म्हणून प्रत्येक ठिकाणी जादा मशीन सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत वेळ वाढविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र सकाळीच मतदान न करता माघारी फिरलेल्या मतदारांचे काय, असा सवाल नागरिक आणि उमेदवारांकडून उपस्थित होत असून ईव्हीएम बिघाडाचा फटका एकूण मतदानाच्या टक्केवारीवर बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.