
बदली झाल्यानंतरही त्याच खुर्चीत बसून गाणे म्हणणे तहसीलदार प्रशांत थोरात यांना चांगलेच भोवले. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयक्तांच्या आदेशावरून थोरात यांना निलंबित केले आहे.
प्रशांत थोरात नांदेडमधील उमरी येथे कार्यरत होते. लातूरच्या रेणापूरमध्ये त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर उमरी येथून ते कार्यमुक्त झाले होते. उमरी तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी थोरात यांनी खुर्चीवर बसून गाणे गायले. त्यांच्या शेजारी एक महिला अधिकारीही बसल्या होत्या.
यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठविला होता. अंगविक्षेप व हातवारे करून थोरात यांनी शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल असे वर्तन केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यांची ही कृती बेजबाबदार ठरवून त्यांना निलंबित करण्यात आले.
दंडाधिकाऱ्यांच्या खुर्चीचा अवमान
प्रशांत थोरात हे ज्या खुर्चीवर बसून गाणे म्हणत होते ती खुर्ची दंडाधिकाऱ्यांची आहे. निरोप समारंभ करायला इतरही जागा होत्या. ज्या खुर्चीवर बसून न्यायदानाचे काम केले जाते त्या खुर्चीचा अशा प्रकारे अवमान करणे कदापि अयोग्य आहे. त्यामुळेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी सांगितले.