तर मी लढाऊ विमानासह देशसेवेसाठी तयार आहे! Operation Sindoor नंतर तेज प्रताप यादव यांचे विधान चर्चेत

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानच्या 26 निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची साट उसळली होती. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुस्थानच्या माता भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’चा तडाखा दिला. यामध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले गेले. या कारवाईनंतर हिंदुस्थानात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनीही एक पोस्ट शेअर करत हिंदुस्थानी सैन्यांचे कौतुक केले. यानंतर त्यांनी केलेली आणखी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर हिंदुस्थानी सैन्याच्या यशाचे कौतुक केले. यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केले. यामध्ये त्यांनी त्यांच्या पायलटच्या पोशाखातील फोटो शेअर केले आहेत. ‘जर पायलटचे प्रशिक्षण देशाच्या कामी येणार असेल तर मी, तेज प्रताप यादव, देशाची सेवा करण्यास नेहमीच तयार आहे. मी पायलट होण्यासाठी प्रशिक्षण देखील घेतले आहे. त्यामुळे देशासाठी माझा जीव गेला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. जय हिंद..!’, या पोस्टसोबत तेज प्रतापने त्यांच्या प्रशिक्षण दिवसांचा फोटो आणि लायसन्सचा फोटो शेअर केले आहेत.

हिंदुस्थाने केलेल्या एअर स्ट्राईकच्या अभूतपूर्व कामगिरीनंतर तेज प्रताप यादव यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तेज प्रताप यादव यांनी बिहार फ्लाइंग इन्स्टिट्यूटमधून पायलट प्रशिक्षण घेतले होते. जेव्हा जेव्हा देशाला माझी गरज भासेल तेव्हा तेव्हा मी देशाच्या सेवेसाठी तयार असेन असे विधान करणाऱ्या तेज प्रताप यांचे देशभरातून कौतुक होत आहे.

हिंदुस्तान जिंदाबाद! हिंदुस्तान सेना जिंदाबाद! जय हिंद!- तेज प्रताप यादव

हिंदुस्थानने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर तेज प्रताप यांनीही प्रतिक्रिया दिली. हिंदुस्थानी सैन्याने आपल्या देशात कधीही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला नाही आणि करणारही नाही. स्त्रीयांच्या सन्मानार्थ हिंदुस्थानी सैन्याने नेहमीच कटीबद्धता बाळगली आहे. आपण सत्य, अहिंसा आणि शांतीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आपण हिंदुस्थानी कधीच काहीही चुकीचे करत नाही. जर कोणी आपले वाईट केले तर आपण ते सहन करत नाही. जर दहशतवादाला प्रोत्साहन देणारे आपल्या एकतेवर, अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर हल्ला करत असतील तर आपल्याला एकत्र येऊन योग्य उत्तर कसे द्यायचे हे माहित आहे. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत 140 कोटी हिंदुस्थानी आणि हिंदुस्थानी सैन्य सरकारसोबत आहेत. जय हिंद!, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.