
दहिसर आणि भाईंदर स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने अहमदाबाद-मुंबई प्रायव्हेट ‘तेजस एक्स्प्रेस’ला बुधवारी दुपारी चौथ्या दिवशीच सव्वा तास उशीर झाला. त्यामुळे आयआरसीटीसीच्या नियमानुसार 630 प्रवाशांना प्रत्येकी 100 रुपये याप्रमाणे 63 हजार रुपये भरपाई मिळणार आहे.
बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल गाडय़ा दीड तास विस्कळीत झाल्या. लांब पल्ल्याच्या चार गाडय़ांना फटका बसला, तर आठ लोकल ट्रेन रद्द झाल्या. 19 जानेवारीपासून सुरू झालेल्या इंडियन कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) खासगी ‘तेजस एक्स्प्रेस’चा बुधवार चौथा दिवस होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास दहिसर ते मीरा रोडदरम्यानचा ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला, परंतु मीरा रोड ते भाईंदरदरम्यानचा विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी दीड तास लागला.
हवाई प्रवाशांसाठी अंधेरीला थांबा दिला!
तेजस एक्स्प्रेस अहमदाबादहून सकाळी 6.40 वा. सुटते आणि मुंबई सेंट्रलला दुपारी 1.10 वा. पोहचते, तर परतीच्या प्रवासाची तेजस दुपारी 3.40 वा. मुंबई सेंट्रलहून सुटते आणि रात्री 9.55 वा. अहमदाबादला पोहचते. विमानतळावर जाणाऱया प्रवाशांसाठी अंधेरी स्थानकात ‘तेजस एक्स्प्रेस’ला दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला होता, तर काही प्रवाशांनी गाडीला विलंब झाल्याने त्यांचे विमान चुकल्याचे सांगितले.

























































