उत्साह, गोंधळ, निदर्शने आणि रेल्वेमंत्र्यांच्या गैरहजेरीतच ‘खासगी तेजस’चे उद्घाटन!

746

पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल मार्गावरील ‘तेजस एक्सप्रेस’ या देशातील दुसऱया खासगी ट्रेनचे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या गैरहजेरीतच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.दिल्ली-लखनौ मार्गावर पहिली खासगी ट्रेन यशस्वी झाल्यानंतर दुसऱया खासगी ट्रेनचे अहमदाबाद-मुंबई रेल्वे मार्गावर जरा गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आगमन झाले. रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध असलेल्या रेल्वे युनियनच्या काळे झेंडे दाखवण्याच्या धमक्या, मराठी भाषेत पाटय़ा न लिहिल्याने झालेला वाद तसेच केवळ गुजरातच्या पेहरावात रेल सुंदरींकडून होणारे स्वागत यामुळे हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे जागोजागी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरी मुंबई सेंट्रल तसेच गुजरातमध्ये निदर्शने करण्यात आली.

ही ट्रेन 533 किलोमीटरचे अंतर 6.30 तासांत कापणार आहे. 19 जानेवारीपासून ही ट्रेन आरक्षित प्रवाशांसाठी सुरू होणार असून गुरुवार वगळता आठवडय़ाचे इतर सर्व दिवस ती धावणार आहे. ‘तेजस’चे भाडे विमान प्रवासाप्रमाणे लवचिक असून मागणी आणि पुरवठा तत्त्वावर तिचे भाडे निश्चित होणार आहे. एसी चेअरकारचे भाडे 1600 रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 2300 रुपये आहे. एसी चेअरकारचे आठ डबे असून प्रत्येक डब्यात 87 आसने आहेत तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे दोन डबे असून प्रत्येक डब्यात 56 आसने आहेत. अशी या गाडीला एकूण 735 आसने आहेत.

…आणि डोक्यावर गांधी टोपी आली

या गाडीमध्ये आदरातिथ्य करण्यासाठी रेल सुंदरी नेमण्यात आल्या आहेत. त्यांना पारंपरिक गुजराथी पेहराव देण्यात आला आहे. गाडी मुंबई सेंट्रल येथून परतीचा प्रवास करीत असल्याने मराठी परंपरागत पेहराव अशी मागणी करण्यात आल्याने अखेर मुंबई सेंट्रल येईपर्यंत पांढऱया गांधी टोप्या रेल सुंदरींच्या डोक्यावर घालण्यात आल्या.

कुली डब्यात अडकला!

या तेजस एक्सप्रेसला स्वयंचलित उघड-बंद होणारे दरवाजे असल्याने प्रवाशांचा गोंधळ होत आहे. एका कुलीने लगेज पोहचविण्याचे पैसे घेताना त्याला वेळ लागल्याने तितक्यात दरवाजे आपोआप मिटल्याने तो गाडीत अडकून बसला. अखेर त्याला पुढील स्थानकात उतरावे लागले.

परळ टर्मिनसचा फेरविचार करणार

परळ रेल्वे कारखान्याच्या जागेवर लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी परळ टर्मिनस बांधण्याच्या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे आश्वासन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खासगी ‘तेजस’ला विरोध करणाऱया सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (सीआरएमएस) युनियनच्या पदाधिकाऱयांची गुरुवारी भेट घेऊन दिले.

‘तेजस’मध्ये प्रवाशांचे बर्थ डे साजरे!

तेजस एक्प्रेसमध्ये प्रवाशांचा विनामूल्य 25 लाखांचा अपघात विमा उतरवला जातो. तसेच  प्रवासादरम्यान घरी चोरी झाली तरी एक लाखापर्यंतची विमा भरपाई देण्याची योजना आकर्षक झाली आहे. तसेच गाडी एक तासापर्यंत लेट झाली तर शंभर रुपयांची भरपाई तर दोन तासांपेक्षा जास्त वेळ लेट झाल्यास अडीचशे रुपयांची भरपाई देण्यात येणार असतानाच आता गाडय़ांमध्ये  प्रवाशांचे वाढदिवसही साजरे केले जात आहेत. तिकिटावर नोंदवलेल्या जन्मतारखेआधारे प्रवाशांच्या नावाची उद्घोषणा करण्यात येऊन त्यांना केवळ कोरडय़ा शुभेच्छा न देता केक कापून शुभेच्छा देण्यात येतात. शुक्रवारी पहिल्या प्रायोगिक फेरीत अहमदाबादहून मुंबईत येताना गौरी राजे, रोहित आणि भावेश यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.

पॅनलच डोक्यावर कोसळले

या गाडीच्या छताला असलेल्या टय़ूब लाइटच्या पॅनलचे आवरण संतोष दुबे नावाच्या ज्येष्ठ प्रवाशाच्या डोक्यावर पडल्याने गोंधळ उडाला. सुदैवाने त्यांना काही दुखापत झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या