
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्या राबडी देवी यांचा उल्लेख ‘पोरगी’ असा केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी एक्स पोस्टद्वारे नितीश यांना जोरदार टोला हाणला आहे. ‘अशा रोग्याला मानसिक स्वास्थ्य एवढेच आपण म्हणू शकतो,’ असे तेजस्वी म्हणाले. विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला घेरल्यामुळे अस्वस्थ झालेले नितीश कुमार यांनी राबडी देवींवर व्यक्तिगत आणि एकेरी भाषेत टीका केली. ही पोरगी काही कामाची नाही. हिच्या घरचे बाजूला झाले आणि हिला पदावर बसवले. ह्या लोकांनी काही काम केलेले नाही,’ असे नितीश म्हणाले.
अशा लोकांमुळे महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन
नितीश यांच्या या वक्तव्यावर तेजस्वी म्हणाले, डिमेन्शिया आणि अल्झायमरचा प्रभाव वाढला की माणूस मानसिकदृष्टया विक्षिप्त होतो. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व इतर महिलांबद्दल वारंवार संकुचित, नकारात्मक मानसिकतेचे प्रदर्शन करणाऱया मुख्यमंत्र्याबद्दल काय बोलणार? त्यांच्या याच मानसिकतेमुळे महिलांच्या विरोधात अत्याचार करण्याचे प्रोत्साहन लोकांना मिळते.

























































