बिहार, चंदिगड आणि आता झारखंड; एकाच आठवड्यात भाजपने लोकशाही आणि संघराज्य केलं नष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी रात्री ईडीने अटक केली. या कारवाईपूर्वी सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून परिवहनमंत्री चंपई सोरेन यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्ष सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही एक ट्विट केले असून एकाच आठवड्यात भाजपने लोकशाही आणि संघराज्य नष्ट केल्याची जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तेजस्वी यादव यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवर म्हटले की, “बिहार, चंदिगड आणि आता झारखंड! भाजपने एकाच आठवड्यात लोकशाही आणि संघराज्य नष्ट केले आहे. निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने तपास यंत्रणांची निष्पक्षता नष्ट करून आणि तपास यंत्रणांना भाजपचे सेल बनवून केंद्र सरकार काय करत आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. आता जनता भाजपचा अहंकार मोडून काढेल. राजद हेमंत सोरेन यांच्या पाठिशी आहे.”

दरम्यान, गेल्याच आठवड्यामध्ये बिहारमध्ये भाजपने पुन्हा फोडाफोडीचे हत्यार उपसले आणि पलटूराम नितीश कुमार यांच्याशी हातमिळवणी केली. नितीश कुमार यांनी राजदची साथ सोडून पुन्हा एनडीएचा रस्ता पकडला. जयदू-राजद सरकार बरखास्त करून त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यानंतर इंडिया आघाडीची लिटमस चाचणी म्हणून समजल्या जाणाऱ्या चंदिगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने चीटिंग केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी इंडिया आघाडीची तब्बल 8 मते जाणीवपूर्वक अवैध ठरवल्याचा आरोप ‘आप’ आणि काँग्रेसने केला असून त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला. भाजप उमेदवार मनोज सोनकर यांना 16 मते तर आप-काँग्रेसचे उमेदवार कुलदीप कुमार यांना 12 मते मिळाली. प्रत्यक्षात त्यांना 20 मते मिळणे अपेक्षित होते.

आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे सूड नाट्य अधिक गतिमान झाले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सूडाने कारवाई केली जात असून बुधवारी रात्री झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. या तिन्ही घटनांचा उल्लेख करत तेजस्वी यादव यांनी भाजपवर निशाणा साधला.