अविवाहितांसाठी हनुमान तर दोनदा लग्न झालेल्या … CM रेवंथ रेड्डींचे हिंदू देवतांबाबत वादग्रस्त विधान

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी हिंदू धर्मातील देवी-देवतांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त टिप्पणीमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. हिंदू धर्मात प्रत्येकाचा वेगळा देव…, जर देवतांवर एकमत होऊ शकत नाही, तर राजकीय नेते आणि डीसीसी अध्यक्षांवर एकमत कसे होईल, असे ते म्हणाले. रेड्डी यांनी हिंदू देवी देवतांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप इतर राजकीय पक्षातून केला जात आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत चर्चा करताना हिंदू देवतांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की हिंदू धर्मात किती देव आहेत? तीन कोटी? जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी हनुमान देव आहे. ज्यांनी दोनदा लग्न केले आहे त्यांच्यासाठी वेगळा देव आहे. जे दारू पितात त्यांच्यासाठी वेगळा देव आहे. येल्लम्मा, पोचम्मा, मैसम्मा. ज्यांना मांस पाहिजे त्यांच्यासाठी एक देव आहे आणि जे डाळ-भात खातात त्यांच्यासाठी दुसरा देव आहे, बरोबर? सर्व प्रकारचे देव आहेत. जर देवतांवर एकमत होऊ शकत नाही, तर राजकीय नेते आणि डीसीसी अध्यक्षांवर एकमत कसे होईल., असे विधान यावेळी त्यांनी केले.

रेवंथ रेड्डी यांनी केलेल्या या विधानावर देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. केंद्रीय मंत्री आणि तेलंगणाचे माजी भाजप अध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी या विधानावर कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून हिंदूंचा द्वेष करण्याची वृत्ती काँग्रेस पक्षात असल्याचा आरोप केला.

 “मी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी हिंदू आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. काँग्रेस नेहमीच एआयएमआयएम (AIMIM) समोर नतमस्तक होणारा पक्ष राहिला आहे. रेवंथ रेड्डी यांनी स्वतः काँग्रेस हा मुस्लिम पक्ष असल्याचे म्हटले होते. ते विधानच त्यांची मानसिकता आणि वैचारिक भूमिका दाखवून देतेय. काँग्रेस हिंदूंचा किती द्वेष करते हे यातून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यभर आंदोलनाची हाक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी रामचंद्र राव यांनी मुख्यमंत्री आणि काँग्रेस सरकारविरोधात राज्यभर निदर्शने व आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी तातडीने विधान मागे घेऊन राज्यातील कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.