विद्यार्थ्यांनी स्वतःचे शौचालय, भांडी स्वच्छ केल्यास लाज कसली? तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची टिप्पणी

विद्यार्थ्यांनी स्वतःची प्लेट, भांडी आणि शौचालय स्वतः स्वच्छ केले तर त्यात लाज बाळगण्यासारखे काय आहे, अशी टिप्पणी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अपरेश कुमार सिंह यांनी केली. हैदराबादच्या किथिनीडी अखिल श्री गुरू तेजाद्वाराकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांनी ही टिप्पणी केली. या याचिकेत सरकारी संस्थामध्ये स्वच्छता आणि खाद्य सुरक्षा संबंधी चिंता व्यक्त करण्यात आली होती. सरकारी शाळा आणि विद्यार्थ्यांना वारंवार होणारी अन्नविषबाधेच्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे, असे न्यायालयाने म्हटले.

न्यायाधीश जीएम मोहिउद्दीन यांच्या पीठाने सरकारकडे स्वच्छता मानके, जेवण तयार करणे आणि स्वयंपाक घरातील स्वच्छतेचा अहवाल मागितला आहे. मुख्य न्यायाधीश कुमार यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगताना म्हटले की, शाळेत शिकत असताना आम्ही जेवण वाटायचो. जेवण झाल्यानंतर स्वतःची थाळी स्वतःच स्वच्छ करायचो. लादी पुसायचो. इतकच काय तर शौचालय सुद्धा स्वच्छ करायचो. यातील कोणतेही काम करण्यात कधी लाज वाटली नाही. उलट असे काम करणे आम्हाला आभिमान वाटायचा, असे ते म्हणाले. यासारखी कामे करणे हे विद्यार्थ्यांना कष्ट करण्याचे शिकवते. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यास मदत करते. रोजच्या आयुष्यात जगताना सन्मान वाढवते. न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही शाळेत अन्न विषबाधा यासारख्या घटनेत वाढ झाली आहे, यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे याचिकाकर्त्याचे वकील चिक्कुडू प्रभाकर यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार आहे.