आमदार फोडण्याचा प्रयत्न, भाजप सरचिटणीसाला तपास पथकापुढे हजर राहण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी तेलंगाणातील आमदारांना ‘खोक्यांचे’ आमीष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तेलंगाणा राष्ट्र समिती या पक्षाशी निष्ठावंत असलेल्या आमदारांनी हा प्रयत्न उधळून लावत त्यांना आमीष दाखवणाऱ्यांना उघडे पाडले होते. आमदारांच्या या फोडाफोडीच्या प्रयत्नात भाजपचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहावे असे आदेश तेलंगाणा उच्च न्यायालयाने भाजपचे सरचिटणीस बी.एल.संतोष यांना दिले आहेत.

विशेष तपास पथकाने संतोष यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती, याला तेलंगाणा भाजपने विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती बी.विजयसेन रेड़्डी यांच्यासमोर सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती रेड्डी यांनी आदेश देताना संतोष यांना तपास पथकासमोर हजर राहण्याचे आदेश दिले, मात्र त्यांना पुढील आदेशापर्यंत अटक करू नयेत असे निर्देशही न्यायमूर्तींनी तपास पथकाला दिले आहेत. 15 नोव्हेंबर रोजी तेलंगाणा उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 7 सदस्यांचे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकाने कोणत्याही पक्षाला किंवा यंत्रणेला अहवाल सादर न करता तो थेट न्यायालयालाच सादर करावा असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

शंभर कोटी रुपये देऊन तेलंगाणातील चार आमदारांना विकत घेण्याचा काही दिवसांपूर्वी प्रयत्न झाला होता. त्या प्रकरणी चौकशीसाठी तेलंगाणा सरकारने विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकाने या प्रकरणी देशातील चार राज्यांमध्ये धाडी घातल्या होत्या. तेलंगाणासह केरळ, कर्नाटक आणि हरियाणामधील सात ठिकाणी या धाडी घातल्या गेल्या होत्या. आमदार खरेदी प्रकरणात धर्मगुरू आणि व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाले होते.

एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सात ठिकाणी धाडी घालून तीन आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे. त्यात हरियाणाच्या फरीदाबादमधील धर्मगुरू रामचंद्र भारती, हैदराबादमधील व्यापारी नंद कुमार आणि तिरुपती येथील सिम्हयाजी स्वामी यांचा समावेश आहे. याशिवाय केरळच्या कोच्ची येथील डॉक्टर जग्गू यांच्या घराची झडती घेण्यात आली. रामचंद्र भारती यांच्या फरीदाबाद आणि कर्नाटकच्या पुत्तूर येथील निवासस्थानांची झडती घेतली गेली. नंद कुमार याचे हैदराबादच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थान आणि हॉटेलांवर धाडी घातल्या गेल्या.

आमदारांशी संपर्क साधून त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी डॉ. जग्गू याने समन्वयाची भूमिका बजावल्याचे चौकशीत उघड झाले आहे. जग्गू यानेच रामचंद्र भारती आणि अन्य एक आरोपी तुषार यांची ओळख करून दिली. तुषार याने केसीआर सरकारमधील आमदार रोहित रेड्डी यांच्याशी संपर्क साधला होता. तुषार आणि जग्गू यांची घनिष्ठ मैत्री असल्याचे सांगितले जाते. एका आमदाराच्या श्रीनिवास नावाच्या नातेवाईकाने सिम्हयाजी स्वामी याच्यासाठी तिरुपतीहून हैदराबादला येणाऱ्या विमानाचे तिकीट बुक केल्याचे चौकशीत आढळले आहे.