विद्यार्थ्यांची डोकॅलिटी; शिक्षकांचा त्रास कमी करण्यासाठी बनवला ‘ऑरगॅनिक खडू’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
organic-chalk

सरकारी शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी नवीन प्रयोग करत ‘ऑरगॅनिक खडू’ची निर्मिती केली आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या ‘जिप्सम खडू’ला आता हा नवा पर्याय त्यांनी निर्माण करून दिला आहे.

हे दोघे विद्यार्थी तेलंगणा राज्यातील अदिलाबाद मधील बंगारी गौडाच्या तेलंगणा स्टेट मॉडेल स्कूल (TSMS)चे विद्यार्थी आहेत. पी. हर्षित वर्मा आणि के. रुद्रा अशी या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.

‘जिप्सम खडू’ने शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना त्रास होतो. नाका-तोंडात जाणाऱ्या पावडरमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. फुफ्फुस आणि डोळ्यात पावडर जाऊन त्यांना इजा पोहोचते. त्यामुळे या खडूला पर्याय या विद्यार्थ्यांनी देण्याचे ठरवले.

हा ऑरगॅनिक खडू बनवण्यासाठी त्यांनी नैसर्गिक पदार्थांचा वापर केला. तांदळाचे पीठ, विशिष्ट प्रकारची माती, आणि आवश्यक असे तेल अशा विविध पदार्थांचा वापर करून हे खडू तयार केले आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. या विद्यार्थ्यांनी कडूनिंबाचे तेल, लिंबाचे तेल याचा वापर प्रामुख्याने करण्यात आला आहे. तसेच चंदन, जास्वंद, गुबाचा सुगंध असलेले खडू त्यांनी तयार केले आहे.

या दोघांनी केलेल्या निर्मितीचे सर्व शिक्षक-विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे.