
सामना ऑनलाईन । नाशिक
बहुचर्चित तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळाप्रकरणातील सर्व 7 आरोपींची आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ठोस पुराव्यांअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बनावट स्टॅम्प प्रकरणातील मुख्यसूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा गेल्या वर्षी म्हणजे 26 ऑक्टोबर 2017 रोजी मृत्यू झाला आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी या प्रकरणात आरोपी आहेत. या आरोपींविरोधात खटला सुरू होता. मात्र पुराव्यांअभावी सर्व आरोपींची सुटका करण्यात आली आहे.
नाशिक येथील सिक्युरिटी प्रेसमधून रेल्वेच्या वॅगनमधून तेलगीने अधिकाऱ्यांच्या मदतीने 32 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होता. या घोटाळ्यातून तेलगीने कोट्यवधींची कमाई केली होती. तेलगीने बोगस ‘स्टॅम्प पेपर’ छापून ते अनेक बँका, विमा कंपन्या आणि शेअर ब्रोकिंग कंपन्यांना विकले होते. तेलगीच्या या प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळ्यात अनेक बड्या नावांच्या सहभागाचीही चर्चा झाली होती. या प्रकरणात तेलगीला 30 वर्षांची शिक्षा झाली होती. याशिवाय तेलगीला तब्बल 202 कोटींचा दंडदेखील ठोठावण्यात आला होता. याप्रकरणात अधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र सीबीआयच्या तपासात सबळ पुरावे नसल्याने आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.



























































