निसर्गाने एसी सुरू केला, हवेतील गारवा वाढल्याने मुंबईकर सुखावले

647

लांबलेल्या पावसामुळे मुंबईमध्ये हिवाळा सुरू व्हायला उशीर झाला आहे. हळहळू थंडीची चाहूल लागली असून मंगळवारी रात्री तापमानात लक्षणीय बदल जाणवला. मुंबईमध्ये रात्री तापमान 21.4 डिग्री होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने मुंबईकर सुखावले होते. मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मंगळवारी रात्री 0.4 अंशांनी तापमान कमी झाले होते. कुलाब्यातही 24 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या तीन आठवड्यात मुंबईचे किमान तापमान 25 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहिले आहे. तापमान घटत असतानाच मुंबईतील हवेची गुणवत्ताही घसरली आहे. किमान तापमान किंचित कमी झालेलं असताना दुसरीकडे कमाल तापमान मात्र थोडंसं वाढलं आहे. मंगळवारी दक्षिण मुंबईत कमाल तापमान 34.8 डिग्री इतके नोंदवण्यात आले. सरासरीच्या ते 1.4 डिग्री सेल्सियसने जास्त होते. मुंबई उपनगरात मंगळवारी 34.2 इतके होते इथे सरासरीच्या 0.5 डिग्री सेल्सियसने जास्त होतं.

देशाच्या पश्चिमी भागात वातावरणातील बदलामुळे तसेच पूर्वेकडून आणि इशान्येकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुढचे 7 दिवस सकाळी आणि संध्याकाळी हवेत गारवा जाणवेल असे तापमान कमी राहील असा अंदाज हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस.जी.कांबळे यांनी वर्तवला आहे.

मुंबईत सर्वाधिक कमी तापमान 69 वर्षांपूर्वी नोंदवण्यात आले होते. त्या वर्षी 19 नोव्हेंबरला  मुंबईत 13.3 सेल्सियस डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती.2018 साली 16 नोव्हेंबर रोजी तापमानाचा पारा 19.2 अंशांपर्यंत खाली घसरला होता. यंदा मात्र अजूनही कडकडीत थंडीला सुरुवात झाली नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या