
राज्यात तीव्र उष्णतेची लाट धडकली आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे. कोकण किनारपट्टी भागातील तापमानाने उच्चांकी पातळी गाठली असून पारा 42.5 अंशांवर गेल्यामुळे सोमवारी मुंबई प्रचंड तापली. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी सात जिह्यांत दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
मार्चच्या सुरुवातीपासून तापमान वेगाने वाढले आहे. मुंबईत मागील आठवड्यात कमाल तापमानाने विक्रमी पातळी गाठली. तापमान सरासरीपेक्षा पाच ते सहा अंशांनी वाढल्यामुळे नागरिकांची दमछाक झाली. हृदयविकार आणि श्वसनविकार असलेल्या नागरिकांना तीव्र उकाड्याने प्रचंड हैराण केले आहे. त्यातच सोमवारी पारा 41 अंशांच्या उच्चांकी पातळीवर गेल्यामुळे मुंबई शहर व उपनगरांसह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरात उष्णतेच्या लाटेचे तीव्र चटके बसले. मुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि पालघर जिह्यातही उष्णतेच्या लाटेचा भडका उडाला आहे. मागील आठवडाभर मुंबई महानगरात उष्ण वातावरण होते. सोमवारी वातावरणात मोठा बदल झाला आणि गुजरातकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी उष्णतेची लाट धडकली आहे. त्या उष्ण वाऱ्यांमुळे पुढील 48 तासांत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर आवश्यक कामाव्यतिरिक्त दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
‘या’ जिह्यांत उष्णतेचा कहर
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, अकोला, अमरावती, वर्धा या जिह्यांत पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेचा कहर सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष म्हणजे, थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सोमवारी 35 अंश तापमानाची नोंद झाली.
पहाटेपासूनच अंगाची लाहीलाही
मुंबईकरांनी सोमवारी पहाटेपासूनच अंगाची लाहीलाही अनुभवली. सांताक्रुझ आणि कुलाबा या दोन्ही हवामान पेंद्रांवर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंद झाले. सांताक्रुझमध्ये 22 अंश, तर कुलाब्यात 24 अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यानंतर उच्चांकी पातळी गाठलेल्या कमाल तापमानाने नोकरदारांची दिवसभर पुरती दमछाक केली.
g आज ठाणे शहरात 41.1 एवढे तापमान नोंदवण्यात आले. कल्याण, डोंबिवली, शहापूर (भातसानगर), मुरबाड येथेही 40 अंश तापमान होते. येत्या 15 दिवसात ठाणे शहर व जिह्यात आणखी कडक उन्हाच्या झळा बसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उष्माघात टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना
उष्णतेच्या लाटेमुळे पेटके येणे, उष्माघात होण्याची शक्यता असते. संभाव्य उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. त्याच अनुषंगाने खबरदारीचे उपाय सुचवले आहेत. जास्त वेळ उन्हात राहणे टाळा, डिहायड्रेशन टाळण्यासाठी तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्या, हलके वजन, हलके रंगाचे, सैल, सुती कपडे घाला, गर्दीच्या वेळी बाहेर जाताना ओले कापड, टोपी किंवा छत्री वापरा, विश्रांतीचा कालावधी वाढवा, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, घाम येणे आणि झटके यापैकी कोणताही त्रास वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जा, असे उपाय हवामानशास्त्र विभागाने एका पत्रकाद्वारे सुचवले आहेत.
तापमान अंशामध्ये
राम मंदिर 42.5
विक्रोळी 41.7
विद्याविहार 39.3
दहिसर 39.1
चेंबूर 38.9
वांद्रे 37.9
भायखळा 36.2



























































