
सामना ऑनलाईन, मुंबई
वर्षानुवर्षे तात्पुरत्या स्वरूपात विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांसाठी खूशखबर आहे. हे प्राध्यापक चालू वर्षीच सेवेत कायम होणार आहेत. देशभरातील प्राध्यापकांची रिक्त पदे युद्धपातळीवर भरली जात असून यापुढे प्राध्यापकांच्या नेमणुका या कायमस्वरूपीच असणार आहेत. त्यामुळे सध्या टेंपररी असलेल्या प्राध्यापकांनाही कायम केले जाणार आहे. तशा सूचनाच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या आहेत.
मुंबई विद्यापीठासह देशभरातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये हजारो प्राध्यापक टेंपररी आहेत. मुंबई विद्यापीठात असे सुमारे दीडशे प्राध्यापक असल्याचे समजते. यूजीसीने गेल्या 4 जून रोजी एक परिपत्रक काढून प्राध्यापकांच्या रिक्त जागा दोन महिन्यांमध्ये भरण्याचे निर्देश सर्व विद्यापीठांना दिले होते. विद्यापीठात किती रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत याची माहिती वेबसाइटवर देण्यात यावी, असेही यूजीसीने सांगितले होते. यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी रिक्त जागांवर किती प्राध्यापकांची भरती झाली याची माहिती विद्यापीठांकडून मागवली आहे. प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे उच्च शिक्षणाच्या दर्जावर परिणाम जाणवू लागला होता. त्यातच नव्या आरक्षण धोरणांमुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रिक्त जागा तातडीने भरण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पदे न भरणाऱ्या विद्यापीठांचे अनुदान बंद करणार
दिल्ली विद्यापीठासह अनेक विद्यापीठांनी त्यांच्याकडील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त पदांसाठी जाहिराती दिल्या आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी पावले न उचलणाऱ्या विद्यापीठांचे अनुदान बंद करण्याचाही यूजीसीचा विचार आहे.

























































