
रस्त्याने पायी चालत जात असलेल्या गरोदर महिलेला एका तीनचाकी टेम्पोने जोरात धडक दिली. त्यामध्ये महिला रस्त्यावर पडली. त्यात तिचा गर्भपात झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहा वाजता संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.
प्रवीण गजानन अडेलकर (वय 26, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक संतोष वसंत पवार (वय 28, रा. शांतीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी सहा महिन्यांच्या गरोदर होत्या. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर येथील चपाती केंद्रावर जेवण आणण्यासाठी पायी चालत जात होते. डॉ. डी वाय पाटील कॉलेजजवळ आल्यानंतर आरोपी टेम्पो चालकाने भरधाव वेगात टेम्पो चालवून फिर्यादी यांच्या गरोदर पत्नीला जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या पत्नीचा गर्भपात झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.



























































