
सामना ऑनलाईन, मुंबई
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत वाढलेला गारठा आज नाहीसा झालेला दिसला. मुंबईचे तापमान एक ते दोन डिग्री सेल्सियसने वाढले. मात्र राज्यात चांगलाच गारठा वाढलेला आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली असून संभाजीनगर, मालेगाव, सांगलीसह विविध शहरांमध्ये कमालीचा गारठा वाढला आहे. मध्य प्रदेशात थंडीचा चांगलाच कडाका आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका आहे. मुंबईत थंडी यायला आणखी 15 दिवस जातील असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे. मंगळवारी मुंबईत 18 डिग्री सेल्सियस, जळगाव 10, कोल्हापूर, 15, महाबळेश्वर 13, मालेगाव 11.8, नाशिक 9.6, सांगली 12.3, सातारा 11.2, संभाजीनगर 9.8, बुलढाणा 12.6, नागपूर 10.9 इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.





























































