
शहर व उपनगरात गेले दोन दिवस पावसाने दडी मारल्याने उकाडा वाढला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण तसेच उन्हाची वाढलेली तीक्रता यामुळे मुंबईकरांची दमछाक होऊ लागली आहे. मंगळवारी कुलाब्यात कमाल तापमानाने ३२ अंशांची पातळी गाठली. अचानक झालेल्या या तापमानवाढीने मुंबईकर हैराण झाले.
जुलैअखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाचा जोर पुढच्या दिवसांत कमी झाला. गेले दोन दिवस पावसाने मुंबई शहर व उपनगराकडे पाठ फिरवली आहे. अचानक पाऊस गायब झाल्याने उकाडय़ात वाढ झाली आहे. मंगळवारी कुलाब्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक म्हणजेच ३२ अंश सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस होते. तसेच सांताक्रुझमध्ये कमाल ३१.२, तर किमान २५.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंद झाले. ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा कमी झालेला जोर यामुळे शहरात उकाडा वाढलाय. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ८९ ते ९० टक्के इतके आहे. पावसाचा जोर कमी-अधिक होणे हा ऑगस्टमधील सर्वसाधारण बदल आहे, असे हवामानशास्त्र विभागाचे संचालक कृष्णानंद होशाळीकर यांनी सांगितले.
पाच दिवसांतील कमाल तापमान
तारीख कुलाबा सांताक्रुझ
- १६ ऑगस्ट ३०.६ ३०.८
- १७ ऑगस्ट ३०.७ ३१.६
- १८ ऑगस्ट ३१.२ ३१.७
- १९ ऑगस्ट ३१.७ ३१.२
- २० ऑगस्ट ३२.० ३१.७

























































