शेततळं बांधून फुलवू आवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रार्थना ठोंबरे, टेनिसपटू

कोरोनामुळे जगभरातील बहुतांशी देशांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हिंदुस्थानातही मार्चच्या अखेरीसपासून लॉकडाऊन करण्यात आले. टेनिसपटू असल्यामुळे वर्षभरातील 30 ते 35 आठवडे मला परदेशात रहावे लागते. मात्र या लॉकडाऊनमुळे मी आई, आजी व लहान बहिणीसोबत राहू शकली. या दोन ते महिन्यांच्या कालावधीत मी आईसोबत बार्शीमधील आमच्या शेतामध्ये तीन कोटी लिटर शेततळं तयार केले. यामुळे आता आमचा भविष्यातील शेतीचा प्रवास सुखकर होईल. आमच्या येथे चार वर्षांतून एखाद वर्ष असे येते की पाऊस पडतच नाही. आता आम्ही पाणी साठवण्यासाठी तळं बनवले आहे. त्यामुळे याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. सध्या तूर व सोयाबीनची लागवड केलीय. डिसेंबर महिन्यात ऊस व जानेवारी-फेबुवारी महिन्यात आंबे व द्राक्ष यांची लागवड करायची आहे.

फेबुवारीच्या अखेरच्या आठवड्यात मी दक्षिण आफ्रिकेत टेनिस स्पर्धा खेळत होते. कोरोनाचा काढता प्रार्दुभाव बघता आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेकडून सर्व स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी सहभागी झालेली स्पर्धाही पूर्ण न करता तेथेच थांबवण्यात आली. 12 मार्चला मी दक्षिण आफ्रिकेतून मुंबई आणि मुंबईहून थेट बार्शी येथे आली. सानिया मिर्झा यांच्या वडिलांकडे मी टेनिसचा सराव करते. त्यामुळे मला वर्षातील बरेच दिवस हैदराबादमध्येच राहावे लागते. माझी कागदपत्रे आणण्यासाठी वडील हैदराबादला गेले आणि त्याचदरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मार्च महिन्यापासून वडील हैदराबाद येथेच आहेत. देशातील परिस्थिती सुधारल्यानंतर मी तिथे सराकाला जाईन. त्यानंतर मी तिथून स्पर्धेला गेले की वडील पुन्हा बार्शीमध्ये येतील.

घरातील सामान उचलून केला व्यायाम

या लॉकडाऊनमध्ये बहुतांशी खेळाडू ‘शेफ’ झालेत. मीही माझ्या आवडीचे पदार्थ बनवून कुटुंबातील सदस्यांना खाऊ घातले. यामध्ये इटालियन डिश पेस्टो सॉस किथ टोरपिला, थाय रेड करी, मँगो कुल्फी, कलिंगडाचा हलका या स्पेशल पदार्थांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर यादरम्यान मी फिटनेसवरही जोर दिला. ट्रेडमिलवर रनिंग केले. घरामधील सामानांचा वेट ट्रेनिंगसाठी वापर  केला. कुंड्या, बादल्या उचलून याचा व्यायाम केला. टेनिस संघटनेकडून आठवडय़ातून एकदा शारीरिक फिटनेसबाबत मार्गदर्शन करण्यात येत होते.

दिग्गजांची आत्मचरित्र वाचली

मी मोबाईलच्या ऍप्समध्ये रमत नाही. मला वाचनाची फार आवड आहे. या लॉकडाऊनमध्ये रोनाल्डो, मोहम्मद अली, नोवाक जोकोकिच, रफाएल नदाल या दिग्गज खेळाडूंची आत्मचरित्र वाचून काढली. तसेच याच कालावधीत माझ्या कमजोर बाबींवरही मेहनत घेतली. वैयक्तिक जीवनापासून खेळांपर्यंत सर्वच स्तराचा यामध्ये समावेश होता.

खबरदारी घेऊन खेळ सुरू होईल

कोरोनानंतर सर्वात शेवटी जो खेळ सुरू होईल तो टेनिस असेल असे मला वाटते. या खेळामध्येही बरेच बदल होताना दिसतील. दोनशेपेक्षा जास्त देशांतील खेळाडू हा खेळ खेळतात. तसेच लढती बघण्यासाठी विविध देशांमधूनही प्रेक्षक येत असतात. सुरुवातीला प्रेक्षकांविना हा खेळ सुरू होईल. बॉल बॉईज यांनाही प्रवेश नसेल. ड्रेसिंग रूममध्ये शॉवरवरही बंदी असू शकते. खेळाडूंना हॅण्ड शेकही करता येणार नाही. बॉल सातत्याने सॅनिटाईज केला जाऊ शकतो. खेळाडूंना टॉवेलही स्वतःचा आणावा लागेल. अशा काही गोष्टी खेळाडूंना ऍडजस्ट कराव्या लागणार आहेत.