टेनिस खेळशील तर तुझं लग्न होणार नाही! सानियाने सांगितली आठवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने लहानपणीच्या काही आठवणी उलगडल्या आहेत. टेनिस खेळलीस तर तुझ्याशी कुणीही लग्न करणार नाही, असं सांगून तिला खेळापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तिच्या लहानपणी झाल्याचं तिने म्हटलं आहे.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये स्त्रिया आणि नेतृत्व या विषयावर व्यक्त होताना तिने तिच्या आयुष्यातील आव्हानांचा लेखाजोखा मांडला. लहानपणी तिला टेनिस खेळू नये यासाठी तिच्या जवळचे अनेक जण विविध नकारात्मक गोष्टी तिला सांगत असत. त्याबाबत ती म्हणाली की, ज्यांच्या मुली खेळाडू होऊ इच्छितात, त्यांचे आई वडील, जवळचे नातेवाईक, शेजारीपाजारी यांनी तिला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यासाठी आधी त्यांनी तिला खेळापासून परावृत्त करण्याचं थांबवलं पाहिजे, असं सानिया म्हणाली.

या विधानाला आपल्या लहानपणच्या आठवणींचा संदर्भही तिने दिला. जेव्हा मी अवघी आठ वर्षांची होते आणि टेनिस खेळत होते, तेव्हा मला त्यापासून परावृत्त करण्यासाठी माझ्या आजूबाजूचे लोक सतत मला सांगत असत. टेनिस खेळण्यासाठी सतत उन्हात राहावं लागेल. त्यामुळे त्वचेचा रंग काळवंडेल. मग तुझ्याशी कुणीही लग्न करणार नाही, असं तिला सांगण्यात येत असे. अर्थात आता ही परिस्थिती बदलली असली तरी अजून पुष्कळ मोठा पल्ला गाठायचा आहे, असंही सानिया यावेळी म्हणाली.