मराठीद्वेष्ट्या कन्नडिगांना भगव्या झेंड्याची अॅलर्जी, बेळगावमध्ये तणाव

97

सामना ऑनलाईन । बेळगाव

कर्नाटकातील मराठी भाषिकांवर कन्नडिगांकडून होणारी दडपशाही सुरूच आहे. बेळगावजवळच्या हलगा-बस्तवाड येथे महालक्ष्मीच्या यात्रेत रथोत्सवाच्या कार्यक्रमात गदगेजवळ भगवा ध्वज लावण्यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी फडकवलेल्या लाल-पिवळा झेंड्याला मराठी भाषीकांनी विरोध करून तो हटविण्याची मागणी केली. तसेच तेथे भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

बेळगावपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या हलगा-बस्तवाड येथे महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झाली आहे. महालक्ष्मी देवी गदगेवर बसल्यावर तेथे भगवा ध्वज लावण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. गुरुवारी देवीचा रथ गावात फिरून गदगेजवळ पोहोचला. मात्र, कन्नड गटाने येथे लाल-पिवळा ध्वज लावला. त्यामुळे मराठी भाषिक तरुणांनीही येथे भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला. यातून दोन गटात तणाव निर्माण होऊन हाणामारी व दगडफेक सुरू झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत दोन्ही बाजूच्या तरुणांना पांगवले.

आपली प्रतिक्रिया द्या