दगडफेक, जाळपोळीनंतर नगरमध्ये तणावपूर्ण शांतता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील गजराजनगरमध्ये मंगळवारी रात्री दोन गटांत मोठा राडा झाला. वादानंतर ‘इंद्रायणी’ हॉटेलजवळ हाणामारी, तर मुकुंदनगरजवळ महामार्गावर दगडफेक करून दुचाकींची जाळपोळ करण्यात आली. या घटनेमुळे शहर व उपनगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. याप्रकरणी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात 50 जणांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयामध्येही दोन गटांमध्ये वाद झाला. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी वेळीच या ठिकाणी धाव घेऊन संबंधितांना पळवून लावल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, शहरात आज तणावपूर्ण शांतता असून, मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गजराजनगर परिसरात झेंडे लावण्यात आले होते. त्यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. यातूनच मंगळवारी सायंकाळी उशिरा एका युवकाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या गटाच्या युवकांना मारहाण करण्यात आली. अवघ्या काही क्षणांतच या वादाचे तीक्र पडसाद उमटले. जमावाने दोन वाहने जाळली. एका वाहनाची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले. हा वाद सुरू असतानाच ‘इंद्रायणी’ हॉटेलजवळ एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर काही क्षणांतच छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर मुकुंदनगरजवळ मोठा जमाव जमा झाला. जमावाने महामार्गावरील ट्रक व इतर वाहनांवर तुफान दगडफेक केली. त्यानंतर तोफखाना पोलिसांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात झाला.

पोलीस अधीक्षक राकेश ओला स्वतः पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. या सर्व घटनेत दोन दुचाकी जाळण्यात आल्या. एका दुचाकीची तोडफोड करण्यात आली. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. मुकुंदनगरजवळ झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेची वार्ता संपूर्ण शहरात पसरताच ठिकठिकाणी जमाव जमला होता. मध्य शहर व सावेडी उपनगर परिसरात काही ठिकाणी ‘हनुमान चालिसा’ कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांकडून रात्री उशिरा घटनेतील आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली.

रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात संतोष साहेबराव कर्डिले (वय 26, रा. कोतकरमळा, वारूळवाडी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून वारूळवाडी येथील रज्जाक नूरखुदा खान, अनुरुद्दीन अबुद्दीन शेख, जिशान कादीर खान व इतर 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतकर हे वारूळवाडी रोडवरील हॉटेल ‘देवांश’समोरून कारमधून गजराज चौकाकडे जात असताना 10 ते 15 लोक जमलेले दिसले. त्यांतील रोहन नंदू धोत्रे याला ‘काय झाले? ’असे विचारले असता, ‘मी सागर ठोंबरे मित्र परिवाराचा फोटो स्टेटसला ठेवला म्हणून ही मुले मला शिवीगाळ करीत आहेत,’ असे त्याने सांगितले. त्यानंतर रज्जाक, अनुरुद्दीन, जिशान यांच्यासह इतर 30 ते 40 जणांनी ‘हाच मेन संतोष कर्डिले आहे,’ असे म्हणून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने स्विफ्ट गाडी फोडली. यानंतर कर्डिले यांना मारहाण करण्यात आली. यासह दीपक बाणखेले, किरण मांजरे यांनाही मारहाण करून पळून जाताना दुचाकी पेटवून दिली. दुसरी फिर्याद रज्जक पनुरलहुद्दा खान (वय 21, मूळ रा. उरखला, जि. बलहामपूर, उत्तर प्रदेश; सध्या रा. गजराजनगर) यांनी दिली असून, अनोळखी पाच ते सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमाज पढून घरी गजराजनगर येथे जात असताना पाच ते सहाजणांनी खान आणि त्यांचा मित्र अमरुद्दीन शेख याला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका – राकेश ओला

गजराजनगरमध्ये दोन गटांत राडा आणि मुकुंदनगर परिसरात दगडफेक झाली. या घटनांचा पोलीस कसून तपास करीत आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच शांतता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे. दरम्यान, ‘ब्रेकींग न्यूज’च्या नावाखाली सोशल मिडीयावरून अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर गुन्हा

सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे व जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने एका तरुणावर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुश्तकीय ईसहाक शेख (रा.बाबरमळा, बुरूडगाव रोड) असे गुन्हा दाखल ल्याचे नाव आहे. याबाबत दिनेश सुरेश बावधने (वय 34, रा. भवानीनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.