
सामना प्रतिनिधी । राहुरी
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या ठार होण्याच्या घटना वाढल्याने राहुरी तालुक्यातील उंबरे, कुक्कडवेढे, जवरेवस्ती, गडाखवस्ती परिसराला बिबट्याच्या दहशतीचे सावट पसरले आहे.
राहुरी तालुक्याच्या पुर्व भागात गेल्या आठवडे भरापासुन बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांना एकाच वेळी अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने बिबट्यांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सद्या या भागात ऊस, मका पिकांचे मोठे क्षेत्र तसेच पाणी उपलब्ध असल्याने बिबट्यांच्या सुरक्षित अधिवासाची व्यवस्था झाली आहे. तर शेतक-यांच्या दावणीला शेळ्या, मेंढ्या, बोकड, गायींच्या कालवडी ही जनावरे असल्याने भक्ष्य मिळणे सुलभ झाले आहे.
जवरे व गडाख वस्ती बिबट्याने हल्ला करून शेळ्या ठार मारल्याचा घटना घडल्या आहेत. बिबट्याच्या धास्तीने शेतमजुराची मशागतीची कामे खोळंबली आहेत. तर बिबट हल्ल्याच्या भितीने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी राहुरी वनविभागाच्या वतीने जवरे व गडाख वस्तीच्या सीमेवर पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र भक्ष्याच्या शोधात बिबट्या जेरबंद होईल या वनविभागाच्या अपेक्षा व्यर्थ ठरल्या आहेत.































































