
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पुलवामा हल्ल्यानंतर पाकडय़ांनी हिंदुस्थानवर समुद्रमार्गे हल्ला करण्याची तयारी सुरू केल्याची धक्कादायक माहिती आहे. याबाबत नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. समुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी शक्यता नौदलप्रमुख लांबा यांनी व्यक्त केली.
संरक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नौदलप्रमुख लांबा यांनी ही माहिती दिली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी पाकिस्तानी ‘लश्कर-ए-तोयबा’ दहशतवादी समुद्रमार्गेच आले होते.नौदलप्रमुख लांबा यांनी पाकिस्तानचे थेट नाव घेतले नाही. मात्र, दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश हिंदुस्थानला अस्थिर करू पाहात आहे, असे त्यांनी सांगितले. एका देशाकडून दहशतवादाला पाठिंबा दिला जात आहे. त्याच दहशतवादाचे परिणाम हिंदुस्थान भोगत आहे.
पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर…
पाकडय़ांनी पुन्हा दहशतवादी हल्ला केला तर हिंदुस्थानपुढे सर्व पर्याय खुले आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, हवाईदलाचा पश्चिम विभाग ‘अलर्ट’ ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानकडून दहशतवादाविरुद्ध काय पावले उचलली जातात यावर हिंदुस्थानचे बारीक लक्ष आहे.

























































