
मीना आंबेरकर
महाराष्ट्रात रोजच्या जेवणात भजी, वडे असे तळणीचे प्रकार फारसे नसतात. खास समारंभासाठी किंवा सणासुदीच्या स्वयंपाकात मात्र आवर्जून भजी किंवा वडे केले जातात. आपल्याकडे अनेक प्रकारचे वडे केले जातात. वडय़ांचे पीठ तयार करून वडे करतात. डाळीचे वडे करण्यासाठी डाळी भिजत घालून वडे करतात. थापून केलेले वडे बहुतांशी पिठाचे असतात. सारणाचे वडे हे गोलाकार किंवा चपटे असतात. उदा. साबुदाण्याचे वडे, बटाटेवडे. एकूण काय हा एक चटपटीत खाण्याचा प्रकार आहे. आज आपण काही वडय़ांच्या खाद्यकृती पाहणार आहोत.

साबुदाण्याचे वडे
साहित्य…1 वाटी साबुदाणा, 2 ते 3 उकडलेले बटाटे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी वरीचा तांदूळ किंवा पीठ व रिफाइंड तेल.
कृती…2 ते 3 तास अगोदर साबुदाणा भिजवून ठेवावा. अर्धी वाटी वरीचे तांदूळ शिजलेले किंवा वरीचे पीठ, अर्धी वाटी उकडलेले बटाटे बारीक करून घालावे. हिरव्या मिरच्या बारीक चिरून व कोथिंबीर सर्व एकत्र करून त्यात पाणी घालून त्याचे छोटे छोटे गोळे करून तळा.

बटाटेवडे
साहित्य…4 ते 5 बटाटे, आले-लसूण पेस्ट व मिरची पेस्ट प्रत्येकी एक चमचा, मीठ चवीप्रमाणे, लिंबू, कोथिंबीर, डाळीचे पीठ दीड वाटी, अर्धा चमचा सोडा, लाल तिखट, मोहनासाठी 2 चमचे तेल, तळणीसाठी तेल.
कृती…बटाटे उकडून, सोलून, कुस्करून घ्यावेत. त्यात मिरची, आले, लसूण पेस्ट तसेच मीठ, कोथिंबीर व लिंबूरस घालावा. सर्व एकत्र करून गोळा तयार करून घ्यावा. डाळीचे पीठ घेऊन त्यामध्ये लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालावे. मोहन व सोडा घालून भजीच्या पिठाप्रमाणे कालवावे. बटाटय़ाच्या सारणाचे छोटे छोटे छोटे गोळे करून डाळीच्या पिठात बुडवून तापलेल्या तेलात तळावे. खोबऱयाच्या चटणीबरोबर खायला द्यावेत.

भोपळ्याचे वडे (घारगे)
साहित्य…अर्धा किलो लाल भोपळा, 3 वाटय़ा चिरलेला गूळ, 1 वाटी तांदळाची पिठी, 4 वाटय़ा रवाळ कणिक, अर्धी वाटी तेल मोहनासाठी, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, तळणीसाठी तेल, अर्धा नारळ.
कृती…भोपळा किसून घ्यावा. नारळाचा आणि भोपळ्याचा चव तेलावर हळद टाकून वाफवून घ्यावा. नंतर त्यात गूळ व मीठ घालावे. गूळ विरघळला की एक उकळी आणून खाली उतरवावे. गरम असतानाच त्यात तांदळाची पिठी व कणिक घालून ढवळावे. त्यावर झाकण ठेवावे. नंतर बेताच्या आकाराचे वडे थापून तळून काढावेत. असे वडे 4 ते 5 दिवस टिकतात.

भरडय़ाचे वडे
साहित्य…1 वाटी चणाडाळ, 1 वाटी उडीद डाळ, 2 वाटय़ा तांदूळ, तेल वगैरे.
कृती…वरील धान्यांचा गिरणीतून भरडा काढून आणावा. त्यात तिखट, मीठ, धण्याजिऱयाची पूड घालावी. तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्यावे आणि मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून ते थापून तापलेल्या तेलात तळावे. ही वडय़ांची बेसिक कृती झाली. वडय़ांचे आणखीही काही प्रकार असतात.
भाजणीचे वडे
साहित्य… वाटय़ा थालीपीठ भाजणी, तिखट, मीठ, हिंग, हळद, डावभर ताक, गरम तेलाचे मोहन, कोथिंबीर.
कृती…2 वाटय़ा भाजणी घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद, कडक तेलाचे मोहन घालावे. डावभर ताक घालून भाजणी कालवावी. कालवताना कोमटसर पाणी वापरावे. भाजणी मळून घ्यावी. नंतर लिंबाएवढी गोळी घेऊन प्लॅस्टिकवर थापावे. वडा बेताच्या आकाराचा थापून मध्ये भोक पाडावे व तळणीसाठी तेल तापत ठेवून त्यामध्ये वडे तळावे. दही किंवा लोणी याबरोबर खाण्यास द्यावे.

























































