‘टीईटी’ निकाल फेरफारमध्ये पैशांची देवाणघेवाण; तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या ओएस, पीएसवर संशयाची सुई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनाथ शिंदे

राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) निकालात फेरफार प्रकरणाची पाळेमुळे आता थेट तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या ‘ओएस’सह ‘पीएस’पर्यंत जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. प्रकरणातील एका आरोपीने थेट तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या सचिवांपर्यंत पैशांचे वाटप केल्याची तोंडी माहिती दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे संबंधित तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या खासगी सचिवासह इतरांवर चौकशीचे सावट घोंगावत आहे.

‘टीईटी’ निकालात फेरफार केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे आणि परिषदेच्या तांत्रिक विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर याला अटक केली. चौकशीत त्यांच्याकडून नवनवीन बाबी उघडकीस येत आहेत. दरम्यान, म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी जी. ए. सॉफ्टकेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख (रा. खराळवाडी, पिंपरी) याच्यासह अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, जि. बुलढाणा), संतोष लक्ष्मण हरकळ (रा. संभाजीनगर) यांना अटक केली होती. त्यानंतर डॉ. देशमुख याच्या घराच्या झडतीत पोलिसांना 40 विद्यार्थ्यांची टीईटी ओळखपत्रे आढळली. त्यासंबंधी चौकशीत परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचे नाव पुढे आले होते. पोलिसांनी सुपे आणि तांत्रिक सल्लागार सावरीकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून नवनवीन माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी आरोपींकडील तपासात आणखी बडे मासे गळाला लागणार असल्याची माहिती दिली.

सचिवापर्यंत पैसे वाटपाची शक्यता

राज्य परीक्षा परिषदेचा तांत्रिक सल्लागार आरोपी अभिषेक सावरीकर आणि तत्कालीन शिक्षणमंत्र्यांचे खासगी सचिवासह इतरांचे संबंध चांगले होते. त्याशिवाय, पुण्यातील जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख आणि परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची मैत्री झाली होती. त्यानुसार त्यांनी एकमेकांत डील करून टीईटीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांकडून 50 हजार ते 1 लाखापर्यंत रक्कम स्वीकारली. त्यानंतर संबंधित रक्कम भागीदारीत डॉ. देशमुख, आयुक्त सुपे, तांत्रिक सल्लागार सावरीकर यांनी वाटून घेतली. त्यानंतर काही रक्कम तत्कालीन मंत्र्यांच्या खासगी सचिवांपर्यंत पोहोचविण्याची आल्याची शक्यता वतविण्यात येत आहे.

दोन आठवडय़ांपासून सायबर टीमला ‘घरोबा’ नाहीच

राज्यभरातील तीन महत्त्वाच्या परीक्षा पेपरफुटीची पाळेमुळे खोदण्यासाठी पुणे सायबर पोलिसांची टीम दिवस-रात्र काम करीत आहे. त्यामुळे मागील दोन आठवडय़ांत कर्मचाऱयांपासून अधिकाऱयांपर्यंत कुटुंबीयांना वेळ देता आला नाही. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या सूचनेनुसार टीममध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पीआय मीनल पाटील, पीआय अंकुश चिंतामण, पीआय संगीता माळी, उपनिरीक्षक अनिल डफळ, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, उपनिरीक्षक रवींद्र गवारी, पडवळ, संदेश कर्णे, नितीन चांदणे, नवनाथ जाधव, सचिन वाजे, अनिल पुंडलिक, मानसी मोरे, शिवले, खेडेकर, कोळी यांचा समावेश आहे.