
आखातात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सगळीकडे जाणवू लागला आहे. खाण्यापिण्याच्या सामानापासून गाडी चालवण्यापर्यंतच्या किमती वाढल्या आहेत. इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा फटका टेक्सटाइल उद्योगाला बसला आहे. यामुळे कपडय़ाच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता टेक्सटाइल असोसिएशन इंडियाने वर्तवली आहे.
युद्धामुळे टेक्सटाइल इंडस्ट्रीजवर परिणाम झाला आहे. इंधन आणि कच्च्या मालांच्या किमती महाग झाल्या आहेत. कॉटन कपडय़ांची प्रोसेसिंग महाग झाली आहे, तर सिंथेटिक फॅब्रिकचा वापर होणारे क्रूड ऑईल महाग झाल्याने पॉलिएस्टरच्या किमती मागील दोन ते तीन महिन्यांत जवळपास 25 टक्के महाग झाल्या आहेत. युद्धामुळे शिपिंग कॉस्टही महाग झाली आहे. आधी 40 फूट पंटेनरचा खर्च 1200 डॉलर होता. आता तो 1900 ते 2000 डॉलरपर्यंत पोहोचला आहे. टेक्सटाइल इंडस्ट्रीजमुळे कमीत कमी 40 ते 45 हजार कंटेनर वेगवेगळ्या पोर्टस्वर अडकलेले आहेत. यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. युनिटमधील उत्पादन 40 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. आधी प्रत्येक मिलमधून दर महिन्याला 15 लाख मीटर कपडय़ाची निर्मिती केली जात होती. ती आता कमी होऊन 8. ते 9 लाख मीटरपर्यंत खाली आली आहे. पीएनजीची कमी आणि केमिकलच्या वाढत्या कॉस्टमुळे इंडस्ट्रीजची परिस्थिती बिघडली आहे. मागील महिन्यात प्रोसेसिंग कॉस्टमध्ये जवळपास 20 टक्के वाढ झाली आहे. आधी प्रिंटिंग 40 रुपयांत होत होती, ती आता वाढून 50 रुपये झाली आहे. कपडे तयार करण्यासाठी अनेक प्रक्रिया होत असते. यात स्पिनिंग, विविंग, डाइंग आणि प्रिंटिंगचा समावेश असतो. या सर्वांमध्ये 100 हून अधिक केमिकल्सचा वापर केला जातो. कच्च्या मालाचा पुरवठा सध्या अडचणीत आला असून या किमतीत 40 ते 50 टक्के वाढ झाली आहे. सिंथेटिक फिलामेंट्सच्या किमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. अनेक टेक्सटाइल मिलने उत्पादनांच्या वेळा 18 तासांवरून 10 तास केल्या आहेत.


























































