
थायलंडच्या (Thailand) संवैधानिक न्यायालयाने पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा यांना त्यांच्या पदावरून निलंबित केलं आहे. त्यांच्यावर कंबोडियन नेते हुन सेन यांच्याशी फोनवर संवाद साधत थाई लष्कराच्या कमांडरवर टीका केल्याचा आरोप आहे. थायलंडमध्ये ही एक गंभीर बाब मानली जाते, कारण तेथे लष्कराचा खूप प्रभाव आहे.
पायतोंगटार्न यांचं कंबोडियन नेते हुन सेन यांच्यासोबतचं संभाषण लीक झाल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. न्यायालयानं त्यांना पंतप्रधानांना पदावरून काढून टाकलं आहे. न्यायालयानं म्हटलं आहे की, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारीची चौकशी केली जाईल. जर त्या दोषी आढळल्या तर त्यांना कायमचं पदावरून काढून टाकलं जाईल.
पायतोंगटार्न यांनी त्यांच्याविरुद्ध नैतिकतेच्या उल्लंघनाचा खटला स्वीकारला आहे आणि आता चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पंतप्रधान म्हणून काम करू शकणार नाहीत. या प्रकरणावर अंतिम निर्णय होईपर्यंत उपपंतप्रधान फुमथम वेचायचाई सरकार चालवतील.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, हा वाद 28 मे रोजी थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादामुळे उद्भवला, ज्यात एका सशस्त्र चकमकीत कंबोडियाचा एक सैनिक मारला गेला. या घटनेनंतर पायतोंगटार्न यांनी कंबोडियाचे नेते हुन सेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी थायलंडच्या लष्करी कमांडरला विरोधक म्हणून संबोधलं आणि कंबोडियाशी तणाव कमी करण्यासाठी सौम्य भूमिका घेतल्याचं दिसून आलं. या कॉलचा ऑडिओ लीक झाल्यानं थायलंडमधील रूढीवादी आणि राष्ट्रवादी गटांनी त्यांच्यावर देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लावल्याचा आरोप केला.
या कॉलमुळे थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली, ज्यात हजारो लोकांनी बँकॉकमधील विजय स्मारक आणि सरकारी भवनासमोर पायतोंगटार्न यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.