Thailand-Cambodia Conflict – थायलंडकडून 8 सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मार्शल लॉ लागू, कंबोडियाविरुद्धचे युद्ध भडकले

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादाने हिंसक वळण घेतले असून, दोन दिवसांच्या चकमकीत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर थायलंडने कंबोडियाच्या सीमेलगत असलेल्या आठ जिल्ह्यांत शुक्रवारी मार्शल लॉ लागू केला. या संघर्षामुळे दोन्ही देशांतील 1.38 लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत स्थलांतर करावे लागले आहे.

काय आहे वाद?

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील 800 किलोमीटरच्या सीमेवर अनेक दशकांपासून वाद आहे. विशेषतः, प्रीह व्हिएर आणि ता मुएन थॉम या प्राचीन मंदिरांभोवतील क्षेत्रावरून दोन्ही देशांचे दावे-प्रतिदावे आहेत. 1907 मध्ये फ्रेंच वसाहती काळात तयार केलेल्या नकाशामुळे हा वाद सुरू झाला. ज्याला कंबोडिया आधार मानतो, तर थायलंड त्याच्या अचूकतेवर प्रश्न उपस्थित करतो. 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) प्रीह व्हिएर मंदिर कंबोडियाच्या हद्दीत असल्याचा निर्णय दिला, तर 2013 मध्ये त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्राचाही कंबोडियाला हक्क दिला. मात्र, ता मुएन थॉम मंदिरावरून वाद कायम आहे.

मे 2025 मध्ये एका कंबोडियन सैनिकाच्या मृत्यूनंतर हा वाद पुन्हा तीव्र झाला. गुरुवारी सकाळी ता मुएन थॉम मंदिराजवळ चकमक सुरू झाली, ज्यामध्ये थायलंडने कंबोडियन सैन्याने ड्रोनद्वारे हेरगिरी आणि आधी गोळीबार केल्याचा दावा केला. तर कंबोडियाने थायलंडने आधी हल्ला केल्याचे म्हटले. यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे.