
थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांना पदावरून निलंबित करण्यात आल्यानंतर सूर्या जुंगरुंगग्रेआंगकिट यांची अवघ्या एक दिवसासाठी पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ बुधवारी संपूर्ण दिवस चालला. थायलंडच्या इतिहासात पहिल्यांदाच नवीन मंत्रिमंडळ शपथ घेत असताना पंतप्रधानांना निलंबित करण्यात आले.
कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी झालेल्या लीक फोन काॅलची चौकशी होईपर्यंत शिनावात्रा यांना संवैधानिक न्यायालयाने निलंबित केले आहे. कंबोडियासोबतच्या अलिकडच्या सीमा वादाच्या हाताळणीवरून शिनावात्रा यांच्याविरोधात नाराज वाढत आहे. लीक झालेल्या या फोन संभाषणात शिनावात्रा आणि हुन सेन हे थायलंड-कंबोडिया सीमा तणाव कसा सोडवायचा आणि संघर्षानंतर लादलेले निर्बंध कसे कमी करायचे, यावर चर्चा करताना ऐकू येत आहेत. विविध वृत्तांनुसार शिनावात्रा यांनी फोन काॅलमध्ये हुन सेन यांचा अंकल म्हमून उल्लेख केला आहे. दरम्यान, याप्रकरणी शिनावात्रा यांना माफी मागावी लागली.
आज होणार मंत्रिमंडळात फेरबदल
सूर्या यांना थायलंडच्या राजकारणात हवामान तज्ञ म्हटले जाते, कारण ते नेहमीच सत्ताधारी पार्टीसोबत असतात. बँकाॅक पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. गृहमंत्री फुमथम वेचायाचाई यांना उपपंतप्रधानपदाची शपथ दिलीजाऊ शकते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सूर्या यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.