ठाण्यातील वृक्षांनी घेतला मोकळा श्वास, पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर झाडांभोवती टाकलेले काँक्रीट काढले

447

नियम धाब्यावर बसवून ठेकेदाराने केलेल्या काँक्रीटीकरणामुळे ठाण्यातील 610 झाडांचा जीव अक्षरशः घुसमटला होता. याविरोधात निसर्गप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर खडबडून जाग आलेल्या अधिकाऱ्यांनी झाडांभोवती टाकलेले काँक्रीट काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर रस्ता ठेकेदाराने झाडांभोवतीचे काँक्रीट दोन फुटांपर्यंत काढले. त्यामुळे गुदमरलेल्या झाडांनी मोकळा श्वास घेतला.

लोकसंख्यावाढीमुळे ठाणे शहरात दिवसेंदिवस काँक्रीटचे जंगल उभे राहत आहे. त्यातच रस्त्यांची कामे करताना अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम लवकर आटोपण्यासाठी थेट झाडांच्या खोडांवरदेखील सिमेंट टाकले. नियमानुसार काँक्रीट टाकताना झाडांच्या भोवती किमान दीड फूट जागा सोडणे गरजेचे असते. मात्र शहरात ठेकेदाराने बेजबाबदारपणामुळे 610 झाडांभोवती सिमेंटचे काँक्रीटीकरण केले होते. त्यामुळे या झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. काँक्रीटीकरणामुळे झाडांच्या मुळांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने झाडांची वाढ थांबली होती, असे वृक्ष तज्ञ दयानंद स्टॅलिन यांनी सांगितले.

‘म्यूज’च्या सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती
‘म्यूज’ संस्थेचे सुशांक तोमर यांनी सांगितले की, संस्थेतर्फे शहरात सर्व्हे करण्यात आला होता. त्यात कोपरी, माजिवडा, कळवा, वागळे, लोकमान्यनगर, सावरकरनगर तसेच उथळसर परिसरातील 610 वृक्षांभोवती काँक्रीटीकरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱयांनी महापालिकेला पत्र पाठवल्यानंतर प्रशासनाने काँक्रीटीकरण हटवण्याचे ठेकेदाराला आदेश दिले. त्यामुळे या झाडांची मरणयातना टळली.

आपली प्रतिक्रिया द्या