
सामना प्रतिनिधी । ठाणे
राजकीय पटलावर नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणाऱया ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर व रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुती आपला गड राखणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी व बविआचा सुपडासाफ होणार आहे. शिवसेना-भाजप युती सरकारने केलेली विकासाची कामे आणि उमेदवारांवर असलेला भक्कम विश्वास याच्या जोरावर पाचही मतदारसंघांवर महायुतीचाच झेंडा फडकणार आहे.
ठाणे हा पारंपरिकदृष्टय़ा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात 23 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत महायुतीचे राजन विचारे व राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात झाली. गेल्या निवडणुकीत कल्याणमधून पराभवाची धूळ चाखल्यानंतर राष्ट्रवादीने पुन्हा आनंद परांजपे यांना ठाण्याच्या रिंगणात उतरवले, पण विचारे यांच्या विकासकामांमुळे राष्ट्रवादीला या वेळेलाही पराभवाचीच धूळ चाखावी लागणार
कल्याणमध्ये एकहाती विजय
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात तर राष्ट्रवादीला सक्षम उमेदवारदेखील मिळाला नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेत नगरसेवक असलेल्या बाबाजी पाटील यांना तिकीट द्यावे लागले, मात्र मतदारांनी कोण हे बाबाजी असे विचारले. श्रीकांत शिंदे यांच्या पाच वर्षांतील धडाकेबाज कामगिरीमुळे कल्याणची जागा शिवसेना एकतर्फीच जिंकणार आहे.
भिवंडीत काँग्रेसला बंडखोरी नडली
भिवंडी लोकसभा मतदारसंघात 15 उमेदवार असले तरी मुख्य लढत महायुतीचे कपिल पाटील व काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यातच झाली, पण पूर्वी खासदारकीचा अनुभव घेतलेल्या टावरे यांना यावेळच्या निवडणुकीत मात्र बंडखोरीचा सामना करावा लागला. भिवंडी महापालिकेतील 40 हून अधिक नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात काम केल्याने टावरे यांची उमेदवारी म्हणजे फुसका बार ठरला. पाटील यांचा धडाकेबाज प्रचार व कामगिरी यामुळेच त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
पालघरमध्ये गावितांनाच कौल
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात यावेळी सर्वाधिक 63.72 टक्के एवढे मतदान झाले. या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जंगी जाहीर सभा झाल्या. त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांना झाला असून बहुजन विकास आघाडीचे आव्हान असले तरी ऐनवेळी ‘शिट्टी’ गायब होऊन ‘रिक्षा’ चिन्ह मिळाल्याने आघाडीचे बळीराम जाधव यांची पंचाईत झाली. गावीत यांचा अनुभव, कार्य लक्षात घेऊन मतदार पुन्हा त्यांनाच लोकसभेत पाठवणार आहेत.
रायगडमध्ये गीतेंचा विजय विक्रमी ठरणार
रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यातील निवडणूक चांगलीच गाजली. गीते हे तब्बल सातव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. केंद्रीय मंत्री म्हणून केलेली कामगिरी, मतदारांचा विश्वास आणि अनुभव याच्या जोरावर रायगडवासी पुन्हा महायुतीचे गीते यांनाच पुन्हा लोकसभेत पाठवून अनोखा विक्रम करणार आहेत, तर राष्ट्रवादीचे तटकरे यांना दुसऱयांदा पराभव स्वीकारावा लागणार आहे.
































































