Thane crime news – ठाण्यात मिंधेंच्या पंटरला अटक, 10 लाखांची मागितली खंडणी

10 लाखांची खंडणी मागणाऱ्या मिंधेंच्या पंटरला खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सोनू पाल असे या पंटरचे नाव असून तो माथाडी कामगार संघटनेशी संबंधित आहे. एका शोरूमचे काम सुरू असताना त्याने कंत्राटदाराला धमकी देत 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ही रक्कम स्वीकारताना खंडणीविरोधी पथकाने सोनू पाल व त्याचा साथीदार गणेश शिंदे या दोघांना रंगेहाथ अटक केली.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका शोरूमचे काम सुरू आहे. या शोरूममध्ये काम सुरू असताना सोनू पाल व गणेश शिंदे यांनी कंत्राटदाराला गाठले. त्यानंतर कंत्राटदाराला तुला काम करून देणार नाही, लेबर देणार नाही, अशी धमकी देत 10 लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी तक्रारदार यांनी खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेत सोनू पालविरोधात तक्रार नोंदवली.

तक्रार मिळताच पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. सोनू पाल याने कंत्राटदाराकडून पैशांची मागणी केल्याचे स्पष्ट होताच खंडणीविरोधी पथकाने सापळा रचला. दरम्यान, सोनू पाल आणि गणेश शिंदे हे दोघे खंडणीची रक्कम वसुलीसाठी शोरूममध्ये गेले असता पथकाने त्यांच्यावर झडप घातली व त्यांना रंगेहाथ पकडले.

सोनू पालवर पाच गुन्हे दाखल

सोनू पाल हा माथाडी कामगार संघटनेशी संबंधित असला तरी त्याला मिंधे गटाच्या एका पदाधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याचे बोलले जाते. राजकीय पाठिंबा असल्याने तो अशा प्रकारे अनेक कंत्राटदारांना त्रास देत असून त्याच्यावर आतापर्यंत पाच ते सहा खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.