ठाण्याचा झाला ‘उडता पंजाब’, शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण अमली पदार्थाच्या विळख्यात; ड्रग्जच्या अड्ड्यांकडे पोलिसांचा कानाडोळा

गेल्या तीन वर्षांत राज्यात ड्रग्जचे मोठे जाळे वाढले असताना ऐतिहासिक ठाणे शहर नशेच्या विळख्यात अडकत चालले आहे. ठाण्यातील गल्लीबोळात चरस, गांजा आणि एमडी यांसारख्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. शाळकरी विद्यार्थी, महाविद्यायातील तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले असून ऐतिहासिक ठाणे शहराचा ‘उडता पंजाब’ झाला आहे. तरुण पिढीमध्ये अमली पदार्थाचे सेवन वाढत चालले आहे. झोपडपट्टीसह उच्चभ्रू वस्तीमधून नशेचे घूर येऊ लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असताना ड्रग्जच्या अड्ड्यांकडे पोलिसांनी कानाडोळा केला आहे.

शहरातील पान टपऱ्यांमधून ई-सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह वेगवेगळ्या ड्रग्जची विक्री जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे शाळा आणि महाविद्यालयातील मुलांना टार्गेट करण्यासाठी ड्रग्ज तस्करांचा वावर या परिसरात वाढला आहे. यामुळे युवा वर्गासह शाळकरी विद्यार्थी राजरोसपणे अमली पदार्थांच्या आहारी जाऊन अख्खी पिढी नशेच्या विळख्यात बरबाद होत आहे. तरुण पिढीला नशेच्या विळख्यात अडकवण्यासाठी ड्रग्जचे रॅकेट चालवणाऱ्या आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच राजकीय आणि सामाजिक घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सेक्स रॅकेट प्रकार वाढीस

अमली पदार्थ, दारू, अफू, चरस, गांजा, एमडी पावडर, सिगारेट, तंबाखू, ड्रग्ज आणि विविध नशेचे तत्सम पदार्थ खुलेआम तर काही लपून छपून बेकायदेशीररीत्या उपलब्ध होत आहेत. ठाण्यासह कळवा, दिवा आणि विशेषतः मुंब्रा परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या या नशेच्या विविध पदार्थांमुळे तरुण पिढी अमली पदार्थाच्या आणि नशेच्या विळख्यात अडकली आहे. शिवाय यासोबतच सेक्स रॅकेटसारखे मानवी तस्करीचे प्रकारही वाढीस लागत आहेत.

हे आहेत हॉटस्पॉट

राबोडी, सरस्वती स्कूल राबोडी, वाकरवाडी उथळसर, क्रांतीनगर, महागिरी, चांभारवाडा, लोकमान्यनगर आणि मुंब्रा, कळवा येथे अड्डे

पोलिसांकडे तक्रारी

शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पानटपऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. ठाणे महापालिकेच्या महासभेतही अमली पदार्थाविरोधात कसून कारवाई व्हावी, याकरिता ठरावदेखील करण्यात आला होता. पण ड्रग्ज तस्करांना रान मोकळे झाले आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

  • ठाणे शहरात अनेक तस्कर आहेत. हे तस्कर विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवत असून विद्यार्थीही ड्रग्जकडे वळू लागले आहेत. पानटपरीवर मिळणारी नशेची गोळी सेवन करून विद्यार्थी शाळेत येतात.
  • अनेक शाळेत विद्यार्थी नशेतच येतात. तसेच विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये नशेच्यागोळ्या, गुटख्याच्या पुड्या, सिगारेट आढळून आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुलांना आकर्षित करण्यासाठी ई-सिगारेटचे प्रकार वाढू लागले आहेत.
  • अमली पदार्थाच्या अड्यांची तसेच ड्रग्ज तस्करांच्या मोडस ऑपरेंडीची माहिती पोलीस दलातील काही विशिष्ठ लोकांना तसेच काही राजकीय नेत्यांना असते. पण वरिष्ठांच्या दबावतंत्राच्या प्रकारातून असो अथवा या तस्करीतून मिळणाऱ्या लाभापायी अशा समाजविघातक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.