Thane crime news – लेकीकडे गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरावर डल्ला

ठाणे – लेकीच्या घरी राहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. यावेळी चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चार चांदीचे देव, ताम्हण, गडवा असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल लांबवला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही आणि तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने शोध सुरू केला आहे. मात्र हाय प्रोफाइल ब्राह्मण सोसायटीत ही घरफोडी झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना 4 कोटी 86 लाखांचा गंडा

डोंबिवली – शेअर बाजारात अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणारी टोळी डोंबिवलीत धुमाकूळ घालत आहे. सेवानिवृत्त दोन ज्येष्ठांना तब्बल 4 कोटी 86 लाख 92 हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर परिसरात राहणारे चंद्रकांत सरवटे (63) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. एप्रिल ते जून 2025 दरम्यान अमेरिकन सेंच्युरी इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि अनुप्रित दागा, एस. एम. सी. ग्लोबल सिक्युरिटी कंपनी यांनी संगनमत करून आपली तब्बल दोन कोटी 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सरवटे यांनी पोलिसांत दिली आहे. तर दुसऱ्या घटनेत डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगर भागात राहणारे बिस्वजित बिस्वास (63) यांची आराध्ये शर्मा यांनी दोन कोटी एक लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.