‘ईडी’चे राजकीय प्रताप; शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर धाड

ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटीच करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, हे नक्की प्रकरण काय आहे, ही सगळी कारवाई नेमकी का केली आहे हे मला माहीत नाही. ईडीकडून चौकशीची कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती, परंतु तरीही छापा टाकण्यात आला आहे. ज्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही त्याची चौकशी केली जात आहे. ईडी ही शासकीय यंत्रणा आहे. त्यांना जे सहकार्य करायचे ते करू आणि सर्वप्रकारची कायदेशीर लढाई लढू असा निर्धारही सरनाईक यांनी व्यक्त केला.

ईडीने मंगळवारी पुन्हा आपला राजकीय प्रताप दाखवला. ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर मंगळवारी सकाळी ईडीने धाड घातली. चौकशीची कोणतीही नोटीस न देता हत्यारबंद 40 सीआरपीएफ जवानांचा ताफा घेऊन दिल्लीतील ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या घरात आणि कार्यालयात घुसले. सरनाईक ठाण्यात नसतानाही ही कारवाई करण्यात आली. सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना अधिकाऱयांनी ताब्यात घेऊन मुंबईतील ईडी कार्यालयात आणले, चौकशी केली आणि नंतर सोडून दिले.

प्रताप सरनाईक हे ठाण्यातील ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्तेही आहेत. मराठी वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी आवाज उठवला होता. तसेच अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बेताल बडबडीला चोख जबाब दिला होता. काही कामानिमित्त सरनाईक ठाण्याबाहेर होते. त्यांच्या अनुपस्थितीतच दिल्लीतील ईडीचे पथक मंगळवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या कार्यालयात आणि घरी दाखल झाले. या ईडीच्या पथकाने 40 हत्यारबंद सीआरपीएफ जवानांचा ताफाही सोबत आणला होता. त्यामुळे सरनाईक यांच्या माजीवडा येथील घराला छावणीचेच स्वरूप आले होते. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱयांनी सरनाईक यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश यांच्या घरी जाऊन चौकशी सुरू केली. दोन तासांच्या तपासणीनंतर ईडीच्या पथकाने विहंग यांना ताब्यात घेऊन मुंबई कार्यालयात आणले. तेथे त्यांची चौकशी केली आणि दुपारनंतर सोडून दिले. सरनाईक यांच्या घरावरील ईडीच्या धाडीची बातमी प्रसारमाध्यमात झळकताच केंद्रातील भाजप सरकारचे दबावाचे राजकारण सुरू असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटल्या.

दबाव टाकण्यासाठीच कारवाई

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात ‘रिपब्लिक टीव्ही’चा अर्णब गोस्वामी याचे नाव आल्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने हे प्रकरण दाबून टाकत तपासाची फाईल बंद केल्याचा आरोप नाईक यांच्या पत्नी अक्षता व मुलगी आज्ञा यांनी केला होता. अर्णब गोस्वामी विरोधात न्याय मिळवण्यासाठी त्यांनी हाक दिल्यानंतर सरनाईक यांनी या प्रश्नावर सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. विधानसभेत अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंगही आणला. अन्वय नाईक आत्महत्या तपासाचे सीबीआय चौकशीचे अपडेटही वेळोवेळी नाईक कुटुंबीयांना द्या अशी मागणीही त्यांनी केली होती. अखेर या प्रकरणात अर्णब गोस्वामी याला अटक होऊन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. अर्णबच्या अटकेनंतर भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून मातम केला होता. तसेच शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र पोलिसांचा अवमान करणाऱया अभिनेत्री कंगना राणावतचे थोबाड शिवसेनेच्या रणरागिणी रंगवतील, तिला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यातच भाजपला पाठिंबा देणाऱया भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी सरनाईक यांच्या पुढाकारामुळे शिवसेनेत प्रवेश केला. त्याचा मोठा झटका भाजपला भाईंदरमध्ये बसला. त्यामुळेच सरनाईक यांच्यावर दबाव टाकण्यासाठीच ही कारवाई केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

धाड का, कशासाठी?

  • अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण लावून धरत यास जबाबदार असणाऱयांवर कारवाई करण्यास भाग पाडले.
  • रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला.
  • मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरसोबत करणारी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
  • भाजपविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतात, तसेच महाविकास आघाडी सरकारची बाजू जोरकसपणे मांडतात.
  • मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करण्याचे काम केले.

महाराष्ट्रात सत्ता मिळत नाही म्हणूनच ईडीमार्फत कारवाई

महाराष्ट्रात सत्ता मिळत नाही म्हणून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याची थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली. राजकीय विरोधकांच्या विरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात सध्या जे सुरू आहे ते विरोधकांच्या नैराश्याचे प्रतीक आहे.लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी राजकीय विरोधकांच्या विरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीने एक वर्ष पूर्ण केले आहे. महाराष्ट्रात आपण पुन्हा सत्तेवर येणार नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे अशी टीकाही त्यांनी केली.

खुन्नस

पुण्या गावचे नेते आपण
कुठे चालला असे
करी या ’कमलपुष्प’
का नसे
खबरदार जर
प्रश्न मांडुनी
विरोध करशील पुन्हा
नोंदवील ईडी
तुजवर गुन्हा

– रामदास फुटाणे

आपली प्रतिक्रिया द्या