
ठाण्यात अनेक प्रश्न आहेत, ठाणेकरांना अनेक समस्यांना रोज तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांचा पाढा माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी मांडला, तोही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर. याला निमित्त होते ठाण्यातील एका कार्यक्रमाचे.
माजी न्यायमूर्ती अभय ओक हे सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती आहेत. त्यांची मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रतिमा अतिशय स्वच्छ होती. त्यामुळे ठाणेकरांच्या प्रश्नांबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेला महत्त्व आले आहे. न्यायमूर्ती अभय ओक यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरूनच ठाण्यातील समस्यांना वाचा फोडली. ठाण्यात 40-50 मजली इमारती उभ्या राहात आहेत. ठाण्यातील घरे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. ठाण्यात परवडतील अशा वैद्यकीय सुविधा किती उपलब्ध आहेत, सर्वसामान्यांना परवडतील अशा शाळा आहेत का, असे प्रश्न ओक यांनी उपस्थित केले.
विशेष म्हणजे ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या भीषण समस्येवर ओक यांनी बोट ठेवले. घटनेच्या 21 व्या कलमाप्रमाणे प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ठाण्यात तशी परिस्थिती आहे का? असा सवाल ओक यांनी केला. ठाण्यात किती नवी उद्याने तयार केली, प्रत्येक शहरात असते तसे सेन्ट्रल पार्क ठाण्यात उभारले का? असा सवाल करत उद्याने उभी केली तर मोकळा श्वास घेता येईल, असे ओक यांनी जाहीर व्यासपीठावरून सुनावले.
मुहूर्त सापडला; तारीख ठरली गडकरी, रंगायतन पडदा 17 ऑगस्टला उघडणार