
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत असलेल्या ठाण्यात सर्वसामान्यांवरील अत्याचाराच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येत असतानाच जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार होत असल्याचे उघडकीस आले आहे. या विद्यार्थ्यांना ओणवे उभे करून त्यांना साचलेल्या पाण्यात डोके बुडवून उभे राहण्याची अघोरी शिक्षा देण्यात आली. हे कमी की काय, त्यात त्यांच्या पाठीवर सीनिअर विद्यार्थ्यांकडून लाकडी दांडक्याने बेदम प्रहार करण्यात येत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच प्रचंड खळबळ उडाली आहे.
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तीनही विभागाच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणापूर्वीचे धडे देण्यात येतात. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांकडून जर चूक झाली तर त्यांना शिक्षाही करण्यात येते. मात्र या महाविद्यालयात देण्यात येणारी शिक्षा अमानवी असल्याचे समोर आले आहे. आज महाविद्यालयात भरपावसात एनसीसीचे ट्रेनिंग सुरू करण्यात आले. या विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यात ओणवे उभे करण्यात आले आणि त्यांना पाण्यात तोंड बुडवून उभे राहण्याची शिक्षा देण्यात आली. एखाद्या विद्यार्थ्याने पाण्यातून तोंड बाहेर काढले तर त्यांच्यावर पाठीमागून त्यांचे सीनिअर लाकडी दांडय़ाने बेदम प्रहार करत होते आणि विद्यार्थी कळवळत होते.
एनसीसीचे हेड हे सीनिअर विद्यार्थीच असतात, पण हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. यामुळे एनसीसीच्या वतीने करण्यात येणारी चांगली कामे झाकोळली गेली आहेत. शिक्षकांच्या गैरहजेरीत हा प्रकार घडला असून संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असे प्रकार घडू नये यासाठी एका समितीची स्थापना करीत आहोत. विद्यार्थ्यांनी घाबरू नये आणि एनसीसी सोडण्याचा विचारही करू नये.
– सुचित्रा नाईक, प्राचार्या, जोशी-बेडेकर कॉलेज.
तक्रार देण्यास नकार
मारहाण करणाऱ्या सीनिअर विद्यार्थ्यांची महाविद्यालयात इतकी दहशत आहे की ज्युनिअर विद्यार्थी त्यांच्यापुढे तोंडही उघडत नाही. इतकेच नव्हे तर त्यांचे पालकही समोर येऊन तक्रार करत नाही, पण महाविद्यालयातील एका सुजाण विद्यार्थ्याने धाडस दाखवत हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि या तालिबानी अत्याचाराचा भंडाफोड झाला.
असले प्रकार खपवून घेणार नाही…
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. महाविद्यालय प्रशासन असे प्रकार खपवून घेणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगतानाच मारहाण करणाऱया विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


































































