Thane – कोपरी पुलाच्या जुन्या मार्गिका दोन दिवस बंद

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या मुख्य जुन्या मार्गिका येत्या दोन दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर वाहतूक शाखेकडून सकाळ-संध्याकाळ ऐन गर्दीच्या वेळी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्य पुलाचे काम सुरू झाल्यास वाहतूक पर्यायी मार्गाने वळवल्यास कोणत्या ठिकाणी कोंडी होऊ शकते, याची चाचपणी वाहतूक पोलिसांकडून केली जाणार आहे. 16 व 17 नोव्हेंबरच्या रंगीत तालमीनंतर जुन्या मार्गिकांच्या कामासाठी एमएमआरडीए पुलाचा ताबा घेणार आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगतीने महामार्गावर वाहतूक बदलांना तोंड द्यावे लागणार आहे.

नवा रस्ता फोडणार कोंडी

काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक शाखा, ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक झाली. सेवा रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची विनंती ठाणे वाहतूक पोलिसांनी महापालिकेस केली होती. त्यानुसार सेवा रस्त्यावर काही प्रमाणात याठिकाणी खड्डे बुजवण्यात आले आहेत. तसेच मुख्य मार्गावरून गुरूद्वासमोर सेवा रस्त्याच्या दिशेने येण्यासाठी पदपथ तोडून एक डांबरी रस्ताही तयार करण्यात आला आहे.

मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी कोपरी रेल्वे उड्डाणपूल अत्यंत महत्वाचा आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी दोन आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येण्यासाठी दोन पदरी मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून या मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. असे असले तरी येत्या काही दिवसांत मुख्य पुलाचे काम एमएमआरडीए आणि मध्य रेल्वेकडून घेतले जाणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावर काम सुरू झाल्यास कोपरी येथील सेवा रस्त्यावर वाहनांचा भार वाढणार आहे.

असे आहेत बदल

  • गुरूद्वारा येथील सेवा रस्त्याकडे जाणारा जुना मार्ग बंद
  • जवळच तीन हात पुलाशेजारी केलेल्या या नव्या रस्त्यावरून 16 व 17 नोव्हेंबरदरम्यान सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत काही वाहने गुरूद्वार सेवा रस्त्यावरून मुंबईकडे जातील.
  • संध्याकाळी 5 ते रात्री 9 दरम्यान काही वाहने हरिओम नगरकडून सेवा रस्त्याने गुरूद्वारामार्गे तीन हात नाका पुलाखाली येतील.
  • सकाळी मुंबईकडे जाताना व सायंकाळी मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी हा सेवा रस्ता एक मार्गी ठेवला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
  • तीन हात नाका पुलाखालून कोपरी येणाऱ्या वाहनांना सेवा रस्त्याचा वापर करावा लागणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुलावरून मुंबईच्या दिशेने उतरणाऱ्या व पुलाखालून येणाऱ्या वाहनांची एकत्रित कोंडी होणार नाही.