ठाणेकरांची धावाधाव..23 हजार स्पर्धकांचा सहभाग

स्मार्ट सिटी… स्मार्ट मॅरेथॉन… असा संदेश देत आज ठाणेकरांची चांगलीच ‘धावाधाव’ झाली. निमित्त होते 30व्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे. त्यात राज्यभरातील 23 हजार स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. पुरुष गटात पुण्याचा करणसिंह घिसाराम याने 21 किलोमीटरचे अंतर 1 तास 30 मिनिटे व 3 सेकंदांत पार करून प्रथम क्रमांक पटकावला. महिला गटात पुण्याची आरती पाटील हिने हेच अंतर 1 तास 27 मिनिटे व 47 सेकंदांमध्ये पार करून अजिंक्यपद मिळवले. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते आजी-आजोबा, अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी भाग घेऊन ‘हम किसी से कम नहीं’ असे दाखवून दिले.

आज सकाळी 6.30 च्या सुमारास महापालिका मुख्यालयाजवळून स्पर्धेला प्रारंभ झाला. शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. विविध गटांमधून ही वर्षा मॅरेथॉन घेण्यात आली. या स्पर्धेत ठाणे व पालघर जिह्यासह राज्याच्या अनेक भागांमधून स्पर्धक आले होते. पर्यावरण राखा… झाडे लावा, भ्रूणहत्या थांबवा, नो प्लॅस्टिक असे अनेक संदेश स्पर्धकांनी दिले. ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. महापौर मीनाक्षी शिंदे तसेच अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा बोलबाला
मॅरेथॉन स्पर्धेत विविध देशांमधील नामवंत खेळाडू सहभागी झाले होते. त्यात शुभम पवार याचाही समावेश आहे. तो उत्कृष्ट जलतरणपटू असून त्याने स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. कॅनडाच्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी ओवी प्रभू तसेच ब्लेडरनर प्रणव देसाई यानेदेखील आज मॅरेथॉनमध्ये धावून आपण ठाणेकर असल्याचे अभिमानाने सांगितले.

किन्नरांचा सहभाग
या स्पर्धेत किन्नर समाजही मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. आम्हीही समाजाचे घटक असून समान वागणूक द्या, असा संदेश किन्नर स्पर्धकांनी दिला. त्याशिवाय मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱया त्रिदल या प्रकल्पाचे कार्यकर्तेही वर्षा मॅरेथॉनमध्ये धावले.

टपाल तिकिटाचे अनावरण
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या इतिहासात प्रथमच बोधचिन्ह असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने घराघरांमध्ये ही वर्षा मॅरेथॉन पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

स्पर्धेचा निकाल
पुरुष गट – 21 कि.मी. (राज्यस्तरीय) – करणसिंग घिसाराम (प्रथम), धनवत रामसिंग (द्वितीय), ज्ञानेश्वर मोरघा (तृतीय), मंजित सिंग (चतुर्थ), प्रल्हाद सिंग (पाचवा), विजय मोरघा (सहावा), दिनकर महाले (सातवा), राजू चौधरी (आठवा), अक्षय जितेकर (नववा), अनिल कोरवी (दहावा)़ महिला- 21 कि.मी. (राज्यस्तरीय) – आरती पाटील (प्रथम), प्राजक्ता गोडबोले (द्वितीय), अक्षया जडीयार (तृतीय), नयन किर्दक (चतुर्थ), तेजस्विनी नरेंदर (पाचवा). 60 वर्षांवरील पुरुष – हरिश्चंद्र पाटील (प्रथम), किसन अरबूज (द्वितीय), चंद्रकांत गायकवाड (तृतीय), दीपक निकम (चतुर्थ), लक्ष्मण गावडे (पाचवा). 60 वर्षांवरील महिला – पद्मजा चव्हाण (प्रथम), मीना दोशी (द्वितीय), रेखा ताम्हणेकर (तृतीय), वृषाली बांदल (चतुर्थ), सिंदुरा येवले (पाचवा).

या शर्यतीला खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, सुभाष भोईर, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृहनेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, शिक्षण सभापती विकास रेपाळे, क्रीडा व सांस्कृतिक सभापती अमर पाटील, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.

झारखंडचा पिंटू विजयानंतरही अपात्र
21 कि.मी. स्पर्धेत झारखंडचा पिंटू यादव प्रथम आला होता. मात्र स्पर्धा संपल्यानंतर त्याला अपात्र घोषित करण्यात आले. ठाणे महापालिकेकडून या शर्यतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. त्यात पिंटू यादवने नाशिक येथील असल्याचे दाखवले होते. परंतु त्याच्याकडे त्याविषयी कोणताच अधिकृत पुरावा नव्हता. विजयी स्पर्धकांची कागदपत्रे तपासताना ही बाब समोर आली. त्यामुळे पिंटू यादवला अपात्र ठरवले.

आपली प्रतिक्रिया द्या