
सामना प्रतिनिधी, ठाणे
दिव्यात झालेल्या ‘ठाणे महापौर चषक’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडियाने बाजी मारली तर महिला गटात डब्ल्यूटीआर, इफ्रा संघांनी विजेतेपद पटकाकले. महिला गटात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पालिकेच्या महिला कबड्डी संघाने उपविजेतेपद मिळवले तर पुरुष गटात सेंट्रल बँक ऑफ इंडिया संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते एक लाख रुपये व ट्रॉफी तर उपविजेत्या संघाला प्रत्येकी 75 हजार रुपये देऊन गौरवण्यात आले.
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यातील दिवा महोत्सव क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला क्रीडारसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. उपमहापौर रमाकांत मढवी यांनी या स्पर्धेचे उत्तम नियोजन केले होते. पुरुष गटाच्या अंतिम लढतीत एअर इंडिया-मुंबई आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया आमनेसामने होते. यात एअर इंडिया संघाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया संघावर एकतर्फी विजय संपादित करून विजेतेपदावर कब्जा केला.
पुरुष गटात उत्कृष्ट चढाईपटू म्हणून सुशांत साईल, उत्कृष्ट पकड काळीराम म्हात्रे, उदयोन्मुख खेळाडू अक्षय मकवाना तर उत्कृष्ट खेळाडू पंकज मोहिती यांनी किताब पटकावला. याकेळी उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष अशोक वैती, नगरसेविका अंकिता पाटील, दीपाली भगत, दर्शना म्हात्रे, नगरसेवक अमर पाटील, दीपक जाधव, उपायुक्त अशोक बुरपुल्ले, सहाय्यक आयुक्त महादेव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.























































