
ठाणे येथे मेट्रोचे काम सुरु असताना एक अपघात घडला आहे. ठाण्याच्या विवियाना मॉलजवळील उत्सव हॉटेलसमोरील ही घटना आहे. बांधकामावेळी गर्डरची लोखंडी प्लेट कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे. सकाळी 9.59 च्या सुमारास हा अपघात घडला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सुनिता बाबासाहेब कांबळे (37) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा क्रमांक 3 येथील रहिवासी असून भंगार गोळा करण्याचे काम करायची. मुंबई नाशिक रोड जवळ, उत्सव हॉटेल समोरच्या बाजूला, विवियाना मॉल, ठाणे (प.) या ठिकाणी मेट्रोच्या कामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पिलरच्या सपोर्टसाठी लावण्यात आलेली लोखंडी प्लेट सुनिता कांबळे या महिलेच्या अंगावरती सदरची लोखंडी प्लेट पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलेच्या अंगावरती पडलेली प्लेट बाजूला करण्यात आली. त्या खड्ड्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.




























































