
हर घर नल से जल.. अशा जाहिराती करून सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे. मात्र ही कामे अनेक ठिकाणी कागदावरच राहिली असून ग्रामीण भागात या योजनेचा घसा अक्षरशः कोरडा पडला आहे. मोखाडा तालुक्यातील कुंडाचा पाडा गावात तब्बल 185 नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र त्यातील केवळ 20 तोट्यांनाच पाणी येत असून महिलांना रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे सरकारच्या योजनेचे तीनतेराच वाजले आहेत.
मोखाडा तालुक्यात अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे लटकली आहेत. याचा फटका भोवाडी गावच्या हद्दीतील कुंडाचा पाडा येथील नागरिकांना बसत आहे. योजनेतून येथे 185 नळ कनेक्शन देण्यात आले. मात्र त्यापैकी केवळ 20 नळजोडण्यांना पाणी येत आहे. त्यामुळे उर्वरित गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
आंदोलनाच्या दणक्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव
जलजीवन मिशन योजनेतील या गोंधळाविरोधात गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. उपअभियंता ललित बोरदे यांनी जोपर्यंत नळयोजनेच्या पूर्ण जोडण्या होत नाहीत तोपर्यंत विहिरीतूनच संपूर्ण गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी संदीप पांघारी, सुनील बांबरे, नवश्या दिघा, लहू पांघरी, बचू दिघा, शांताराम दिघा, कमळू घुमल तसेच भोवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.