आदिवासी विद्यार्थ्यांचे साबण, तेल, केस कटिंगचे पैसे ढापले, मुरबाडच्या आश्रमशाळेच्या अध्यक्षांचा ‘झोलझाल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र हाच निधी भ्रष्टाचाराचे पुरण झाल्याचा प्रकार मुरबाडमध्ये उघडकीस आला आहे. वाल्हिवरे आश्रमशाळेच्या अध्यक्षाने खोटी बिले तयार करून विद्यार्थ्यांच्या साबण, तेल, केस कटिंग तसेच अन्य वस्तूंसाठी आलेल्या पैशांवर ‘ढापाढापी’ केली आहे. याचा आश्रमशाळेच्या चिटणीस व कोषाध्यक्षांनी आवाज उठवत भंडापह्ड केला आहे.

लोकसेवा शिक्षण संस्थेची वाल्हिवरे येथे आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळा समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण पवार असून त्यांनी 2018-19 मध्ये शासनाकडून आलेल्या लाखो रुपयांच्या निधीवर डल्ला मारला आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता सरकारी गणवेश, भोजन, वह्या-पुस्तके इतकेच नाही तर तेल, साबण, केस कटिंग यांसाठीदेखील तरतूद  करते. पटसंख्येनुसार 25 ते 30 लाखांच्या दरम्यान हा निधी असतो. मात्र वाल्हिवरे आश्रमशाळेतील मुलांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कपात करून खोटी बिले बनवण्यात आली व निधी ढापण्यात आला. लोकसेवा शिक्षण संस्थेला वाल्हिवरे आश्रमशाळेतील या कारभारात काळेबेरे वाटल्याने  त्यांनी संस्थेचे चिटणीस गोविंद घावट व कोषाध्यक्ष संतोष धिगे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या द्विसदस्यीय समितीने आश्रमशाळेला भेट देऊन सर्व प्रकारची खातरजमा केली. त्यात बाळकृष्ण पवार यांनी अपहार केल्याचे उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सेटलमेंट करा.. नाहीतर जीवानिशी जाल.. 

वाल्हिवरे आश्रमशाळेतील भ्रष्टाचाराचा अहवाल तयार करून गोविंद घावट व संतोष धिगे संस्थेला सादर करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी  बाळपकृष्ण पवार यांचा पुतण्या व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी त्यांना अडवले. हा सर्व प्रकार मिटवा.. सेटलमेंट करा.. अन्यथा जीवानिशी जाल, अशी धमकीच त्यांनी दिल्याचा आरोप घावट आणि धिगे यांनी केला आहे.

तक्रार करूनही कारवाई नाही

बाळकृष्ण पवार यांच्या पुतण्याने धमकावल्यानंतर संस्थेने टोकावडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र सर्व पुरावे सादर करूनदेखील पोलीस कारवाई करण्यात चालढकल करत आहेत. दरम्यान याबाबत आश्रमशाळेचे अध्यक्ष बाळपृष्ण पवार यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली.