विकला जाणार नाही, फुटणार नाही! मनसे उमेदवाराच्या पतीला पैशांची ऑफर

भाजपचा निवडणुका बिनविरोध करण्याचा फंडा पुन्हा एकदा ठाण्यात समोर आला आहे. प्रभाग भाजपची क्रमांक ११ मधील मनसे उमेदवाराचे पती महेश इंगळे यांना भाजपने थेट पैशांची ऑफर करत तू व्यवस्थित सेटल होशील, खूश होशील, फक्त तुझ्या पत्नीची उमेदवारी मागे घे, असा तगादा लावला होता असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र या ऑफरला इंगळे बळी पडले नाही. मी महाराष्ट्र सैनिक आहे, त्यामुळे मी विकला जाणार नाही, फुटणार नाही, माझ्या रक्तात गद्दारी नाही असा व्हिडीओच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

महापालिकेच्या निवडणुका कोणत्या थराला गेल्या आहेत याच्या वेगवेगळ्या बातम्या दररोज समोर येत आहेत. राज्यात ५० हून अधिक उमेदवार सत्ताधारी पक्षातून बिनविरोध निवडून आले. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला धमक्या, कोट्यवधी रुपयांची आमिषे दिली गेली. असाच आणखी एक प्रकार ठाणे महानगरपालिका निवडणुकीत समोर आला. प्रभाग क्रमांक ११ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार सीमा इंगळे यांचे पती महेश इंगळे यांनी गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून त्यांनी या प्रकरणाचा भंडाफोड केला आहे. भाजप उमेदवाराचे दीर सचिन पाटील यांनी महेश इंगळे यांना दिवसभर फोन करून उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप इंगळे यांनी केला.