
भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोमध्ये नव्याने होत असलेली नोकर भरती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ आणि विधी अधिकारी या पदांच्या भरतीसाठी झालेल्या लेखी आणि तोंडी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर न करताच प्रशासनाने ठरावीक उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवले आहे. त्यामुळे या भरतीबाबत मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सिडको ओबीसी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनने केला आहे.
सिडकोची स्थापना झाल्यापासून सिडकोमध्ये अनेक वेळा नोकरभरती झाली आहे. प्रत्येक नोकर भरतीच्या वेळी सिडकोकडून घेतल्या जाणाऱ्या लेखी आणि तोंडी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर केली जात होती. या यादीत सर्वच उमेदवारांचा मेरिट लिस्टनुसार समावेश असायचा. मात्र सिडकोने नुकतीच कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ आणि विधी अधिकारी या पदांची भरती करण्यासाठी लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली. हजारो उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये आपल्याला किती गुण मिळालेले, निवड झालेल्या उमेदारांना आपल्यापेक्षा किती गुण जास्त आहेत, याचा कोणाला काहीच थांगपत्ता नाही. या परीक्षेची मेरिट लिस्ट जाहीर न करताच सिडको प्रशासनाने ठरावीक उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षार्थीनी संताप व्यक्त केला आहे.
- सिडकोने नोकर भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेला हजारो उमेदवार बसले होते. त्यांच्याकडून परीक्षाशुल्कही आकारण्यात आले होते.
- सिडकोच्या धर्तीवर मुंबई महापालिका प्रशासनानेही नोकर भरतीसाठी परीक्षा घेतली होती. त्यांच्या परीक्षेला २७हजार उमेदवार बसले होते. त्यांनी २७ हजार उमेदवारांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
- मुंबई महापालिका परीक्षार्थीची यादी जाहीर करते, तर मग सिडकोला अडचण काय असा सवाल मोकल यांनी उपस्थित केला आहे.
सर्वच उमेदवारांची यादी मिळालेल्या गुणांसह जाहीर करा
सिडकोमध्ये यापूर्वी नोकर भरतीसाठी झालेल्या परीक्षांचा संपूर्ण निकाल जाहीर केला जात होता. परीक्षेला बसलेल्या सर्वच उमेदवारांना आपल्याला किती गुण मिळालेत हे कळत होते. मात्र आता सिडको प्रशासनाने या पद्धतीला बगल दिली आहे. त्यामुळे परीक्षार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे नोकर भरतीसाठी नुकत्याच झालेल्या लेखी आणि तोंडी परीक्षेत सर्वच उमेदवारांना किती गुण मिळाले आहेत, याची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी अध्यक्ष रमेश मोकल यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.