दिवाळीत रक्तदाते सुट्टीवर; ब्लड बँकेमध्ये तुटवडा, ठाण्यात पाच दिवस पुरेल एवढेच रक्त

ठाण्यात केवळ पाच दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा असल्याचे समोर आले आहे. दिवाळीत रक्तदाते सुट्टीवर असल्याने रक्तदान मोहीम थंडावली असून त्याचा फटका ठाणे जिल्ह्यातील सहा सरकारी रक्तपेढ्यांना बसला आहे. या रक्तपेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साठा कमी झाल्याने अपघातग्रस्त, कॅन्सरग्रस्त, गर्भवती माता आणि डायलिसिस रुग्णांची फरफट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने येत्या काही दिवसांत मुबलक रक्तसाठा न झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागणार असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालय, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालय, कल्याण-डोंबिवली महापालिका, नवी मुंबई पालिका आणि मीरा-भाईंदर महापालिका या सहा ठिकाणी सरकारी रक्तपेढ्या आहेत. मात्र सहा सरकारी रक्तपेढ्यांमधील साठा कमी झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ लागला आहे.

नातेवाईकांना वणवण भटकावे लागत आहे

रुग्णांच्या शस्त्रक्रिया, अपघात, महिलांना प्रसूतीवेळी रक्ताचा पुरवठा रुग्णालयांना करावा लागतो. सध्या जिल्ह्यातील रुग्णालये विविध साथीच्या आजारांनी फुल्ल झाली आहेत. त्यातच अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासू लागल्याने रक्त मिळवण्यासाठी नातेवाईकांना जिल्ह्याबाहेर वणवण भटकावे लागत आहे.

रक्तदानासाठी पुढाकार घ्या!

इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, महाविद्यालयीन तरुणींनी रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करावी व रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच रक्तदान शिबीर आयोजित करावयाचे असल्यास नागरिकांनी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी गिरीश चौधरी (९८६९६८५२८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.