
जीवघेणे खड्डे, अवजड वाहतूक.. तासन्तास होणारी ट्रैफिक जाम त्यामुळे घोडबंदरवासीय अक्षरशः पिचला आहे. मात्र या विभागाचे आमदार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून घोडबंदर रोडवरील या रोजच्याच नरकयातनांविरोधात आज ठाणेकर रस्त्यावर उतरले. संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर पडलेल्या खड्यात शीर्षासन करत प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. ‘नेत्यांनी घेतली टेस्ला.. घोडबंदर खड्ड्यात फसला’, ‘या सरकारचे करायचे काय.. खाली डोके वर पाय’ अशी जोरदार घोषणाबाजी करत ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदनगर नाक्यावर साखळी आंदोलन केले.
ठाणे महापालिका हद्दीत असलेला घोडबंदर हा मार्ग उरण जेएनपीए बंदरातून वाहतूक करणाऱ्या आणि गुजरात तसेच इतर राज्यात जाणाऱ्या अवजड वाहनचालकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच मीरा-भाईंदर, वसई, विरार, पालघर भागातून ठाणे, नवी मुंबईत कामानिमित्त वाहतूक करणाऱ्या नोकरदारांसाठीही हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. गायमुख घाट, घोडबंदर रोड या रस्त्यावरून अवजड आणि हलक्या वाहनांची दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. या मार्गावर पडलेले खड्डे, विरुद्ध दिशेने सुरू असलेली वाहतूक, अवजड वाहनांमुळे रस्त्याची झालेली बिकट अवस्था याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. या विरोधात आज ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’ या संस्थेने आंदोलन करत शासकीय यंत्रणेची पोलखोल केली.
एकनाथ शिंदे वेळ देत नाहीत
घोडबंदरच्या प्रश्नाविषयी आम्ही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला शिंदे वेळ देत नाहीत. कित्येक महिन्यांपासून अवघ्या १० मिनिटांचा वेळ घेण्याकरिता प्रयत्न करत असूनदेखील आम्हाला भेट दिली जात नाही. त्यामुळे आमच्यावर आंदोलनाची वेळ आली असल्याचा आरोप ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’चे सदस्य पंकज सिन्हा यांनी केला.
…. तर चक्काजाम करून दाखवू
वाहतूककोंडीविषयी अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून येथील कोंडी आणि खड्यांची समस्या सोडवता आलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी आज सकाळी आंदोलनाचा निर्णय घेतला. ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’ या संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. घोडबंदर येथील आनंदनगर चौकात वाहतूक पोलि सांची चौकी असूनदेखील कोंडी सोडवता येत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
“आम्ही रविवारी सर्व नागरिक रस्त्यावर उतरणार होतो, परंतु शांततेच्या मार्गाने आंदोलन करू असा निर्णय आम्ही घेतला. आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात लाखो नागरिक रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतील. घोडबंदर भागातील नागरिकदेखील आता आंदोलनासाठी तयार आहेत. आम्ही सर्व नोकरदार सुट्टी घेऊन हे आंदोलन करू.“
राधिका राणे (सदस्य जस्टीस फॉर घोडबंदर रोड)