रुग्णाला घेऊन जाताना मोखाड्यात अपघात, भरधाव रुग्णवाहिकेने दुचाकीस्वारांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

रुग्णाला घेऊन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव रुग्णवाहिकेने दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार अनिल खरपडे व चिंतामण किरकिरे या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून रुग्णवाहिकाचालकदेखील जखमी झाला आहे. रुग्णवाहिकाचालक रमेश बर्डे याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बेदरकारपणे रुग्णवाहिका चालवणाऱ्या बर्डेविरोधात मोखाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जव्हार येथे राहणारा रमेश बर्डे हा शासकीय रुग्णवाहिकावर चालक म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी तो हृदयविकाराने पीडित असलेल्या रुग्णाला घेऊन उपचारासाठी नाशिक येथे निघाला होता. दरम्यान रात्री साडेआठच्या सुमारास निळमाती गावाजवळ असलेल्या वळणावर त्याचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्ण बचावला आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णाला दुसऱ्या रुग्णवाहिकेच्या मदतीने नाशिकला रवाना केले, तर रमेश बर्डे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

चालकावर गुन्हा

रमेश बर्डे याने रुग्णवाहिकेत रुग्ण असतानादेखील बेदरकारपणे वाहन चालवून त्याचा जीव धोक्यात आणला. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना चिरडल्याप्रकरणी पोलिसांनी बर्डे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी दिली.